Join us

सिडकोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By admin | Published: January 11, 2015 10:25 PM

नवी मुुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या राहत्या घराच्या जमिनी मेट्रोच्या सेंटरने चुकीच्या पद्धतीने संपादून सिडकोला हस्तांतरित केलेल्या आहेत.

उरण : नवी मुुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या राहत्या घराच्या जमिनी मेट्रोच्या सेंटरने चुकीच्या पद्धतीने संपादून सिडकोला हस्तांतरित केलेल्या आहेत. अशा जमिनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. न्यायासाठी संबंधित प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा न्यायालयाबरोबरच विधानसभेतही सुरू झाल्याने सिडकोचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबई सानपाडा येथील वसंत वाघ्या पाटील यांची आणि इतर प्रकल्पग्रस्तांच्या मालकीची २३ गुंठे जमीन आहे. सर्वे क्र. ६६ मधील जमिनीवर प्रकल्पग्रस्तांची राहती घरे आहेत, मात्र नवी मुंबई निर्मितीदरम्यान राहत्या घरांच्या जमिनी मेट्रो सेंटरने चुकीच्या पद्धतीने संपादित केल्या. राहत्या घरांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने संपादन करण्याच्या विरोधात संबंधितांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले आहेत. आमदार अनंत गाडगीळ, शरद रणपिसे, भाई जगताप यांनीही सिडकोने चालविलेल्या प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली आहे. (वार्ताहर)