विशेष प्रतिनिधी मुंबई : सिडकोमार्फत नवी मुंबईतील सी वूड सेक्टर ५८ मधील भूखंड व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेस कमी किमतीत दिल्या प्रकरणी एक महिन्याच्या आत दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता. सिडकोच्या तत्कालिन पणन व्यवस्थापकांनी हा भूखंड केवळ ४ कोटी रुपयात विक्री करून सिडकोचे १६ कोटींचे नुकसान केले. या प्रकरणी काय कारवाई केली असा सवाल त्यांनी केला. २००३-०४ मध्ये सिडकोच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालकांनी केलेल्या भूखंड वाटपाची चौकशी करण्यासाठी डॉ.डी.के.शंकरन समिती नेमण्यात आली होती. त्यातील प्रकरणांची चौकशी न करता संगनमताने ती दाबण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला.यावर, डॉ.पाटील यांनी सांगितले की, सी वूड सेक्टर ५८ मधील भूखंड व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या भूखंडाचे प्रकरण शंकरन समितीच्या कक्षेत नव्हते. सीआयडीमार्फत चौकशी झाली. त्यात गुन्हे दाखल करण्याचे शिफारस सीआयडीने केलेली नव्हती, असे पाटील यांनी स्पष्ट केले. शंकरन समितीतील ५२ प्रकरणांमध्ये कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. अतुल भातखळकर, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.
सिडको भूखंड गैरव्यवहारप्रकरणी होणार चौकशी - गृहराज्यमंत्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 6:16 AM