तळोजा : स्मशानात कामगारांची कमतरता आणि ओल्या लाकडांमुळे सिडकोच्या कळंबोली, कामोठे, खारघर येथील स्मशानभूमीत मृताच्या नशिबी मरणयातना भोगाव्या लागत आहे. स्मशानातील कामगारांवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना मजुरी करावी लागत आहे. हे कमी की काय ओल्या लाकडांमुळे मृतदेह अर्धवट जळत आहे. सिडको प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मृताच्या नशिबी मरणयातना भोगाव्या लागत असून येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सिडकोच्या कळंबोली, कामोठा, खारघर येथील स्मशानभूमीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कामचुकार ठेकेदारामुळे मृताला सरणावर ठेवल्यानंतर चांगली लाकडेही उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेक वेळा मृतदेह अर्धवट जळण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. स्मशानात लाकडांची व्यवस्था करण्यात किमान चार तासांचा वेळ लागत असल्याने नातेवाईक कंटाळून जातात.या स्मशानभूमीत एकूण ८ कामगार असून प्रत्येक पाळीला २ कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. मयताला सरणावर ठेवल्यानंतर लाकडे लावण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. तसेच दुसऱ्या दिवशी राख गोळा करणे व स्मशानाची स्वच्छता करण्याची जबाबदारी त्यांचीच असते, मात्र एका वेळी अधिक मृतदेह स्मशानात आणल्यानंतर या ठिकाणी गोंधळ निर्माण होत आहे. (वार्ताहर)च्कळंबोली-१, कामोठा -१, खारघर - २ अशा एकूण ४ स्मशानभूमीत सध्या ७ रुपये किलो दराने लाकडे दिली जातात. या एकूण शहरांची लोकसंख्या साधारण ४ ते ६ लाखांच्या घरात आहे. एकावेळी मयताला साधारण ३५० ते ४५० किलो लाकडे लागतात. म्हणजेच ३१५० रुपये स्मशानभूमीत खर्च येतो. काही मृतांच्या नातेवाइकांना ही रक्कम परवडत असली तरी हातावर पोट असणाऱ्या गरिबांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सिडकोकडून लूटच्नवी मुंबई, मुंबई पालिकेकडून अंत्यविधीसाठी लाकडे मोफत देत असताना सिडको प्रशासनाकडून मात्र स्मशानात अव्वाचा सव्वा दराने लाकडे दिली जात आहेत. ही लाकडे वन विभागाकडूनच ओल्या अवस्थेत येत असतात व तीही वजनावर संबंधित ठेकेदाराला घ्यावी लागतात. ओल्या लाकडांमुळे मृतदेह पूर्णपणे जळत नाही.मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे मयताच्या नातेवाइकांना हा त्रास होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.- नंदकिशोर परब, आरोग्य अधिकारी, सिडको.
सिडकोच्या स्मशानभूमीत नातेवाइकांना मरणयातना !
By admin | Published: April 12, 2015 12:11 AM