शालिनी ठाकरे यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - बॉडी बिल्डर आणि मिस्टर इंडियासारखा नावाजलेला किताब जिंकणारा मनोज पाटील या जोगेश्वरीतील मनसे कार्यकर्त्याला सिने अभिनेता साहिल खानकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याबाबत मनोजच्या आईवडिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली आहे. मनसेने न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या मिल्लतनगर येथील कार्यालयात त्यांची भेट घेतली.
ओशिवरा पोलिसांनी साहिल खानवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आम्ही पोलिसांकडे त्याच्या अटकेची मागणी केली आहे, असे शालिनी ठाकरे यांनी लोकमतला सांगितले.
एकीकडे मराठी तरुण स्वतःच्या कर्तृत्वावर व्यावसायिक यश मिळवीत असताना बाहेरून आलेली लोकं जर त्याच्या मार्गात खोटे आरोप करून अडसर निर्माण करीत असतील तर महाराष्ट्र चित्रपट कर्मचारी सेना त्यांना इथे कदापि टिकू देणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. साहिल खानचा नवी मुंबईतील कार्यक्रम मनसेने उधळून लावला आहे. यापुढे त्याच्यावर कारवाई झाली नाही तर त्याला या शहरात काम करू देणार नसल्याचा इशारा मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने दिला आहे. मनसे मनोजच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------------