मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते. मात्र, आता उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल सुरू होत आहेत. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा हॉल मालकांनी आणि प्रेक्षकांनी यासाठी विशेष खबरदारी घ्यायला हवी.
दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे की, पीव्हीआर सिनेमाने उद्यापासून लोकांचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. यामध्ये काही खास लोकांना मोफत तिकीट सुविधा देण्यासह सिनेमा हॉलमध्ये लोकांच्या सुरक्षेतेची व्यवस्था करण्याचा समावेश आहे. अगदी खाण्यापिण्याची सुरक्षित व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा हॉल उघडताच म्हणजे उद्या पीव्हीआर आपल्या कर्मचार्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक मोफत सिनेमा शोचे आयोजन करणार आहे. तर वीकेंडला कोरोना वॉरियर्सचे नाव देण्यात येणार आहे. म्हणजेच कोरोना वॉरियर्सला आठवड्याच्या शेवटी मोफत सिनेमा दाखविण्यात येणार आहे. तसेच, कोरोना संकट काळात पहिल्यांदाच सिनेमा हॉल उघडणार असल्यामुळे सुरक्षेतेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे लोकांसाठी असलेल्या सिनेमा हॉलचा अनुभवात मोठा बदल दिसणार आहे.
तिकिट बुकिंगची पद्धत बदलणारआता सिनेमागृहात डिजिटल तिकिट बुकिंगवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी बॉक्स ऑफिसवर एकच काउंटर उघडला जाईल. तसेच, जर कोणाला सुरक्षेसाठी पीपीई किट खरेदी करायची असेल तर ती या काउंटरवर उपलब्ध असणार आहे.
सिनेमागृहांमध्ये अशी असणार एंट्रीसिनेमागृहात प्रवेश करताना आपले तापमान तपासले जाणार आहे. आरोग्य सेतु अॅप तुमच्या फोनमध्ये आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच, सिनेमागृहांमध्ये ५० टक्के प्रेक्षक असतील, या नियमांचे पालन केले जाईल. ज्याअंतर्गत प्रत्येकासाठी एक सीट सोडून बसण्याची व्यवस्था केली जाईल.
सिनेमा संपल्यानंतर... सिनेमा संपल्यानंतर संपूर्ण हॉलचे सॅनिटायजेशन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्न आणि पेय पदार्थांसाठी एक विशेष युव्ही स्टॅरेलायजेशन कॅबिनेट ठेवण्यात येईल आणि ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी त्या वस्तूचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच, आधीच पॅक केलेले खाद्यपदार्थ याठिकाणी ठेवले जातील. याशिवाय, सिनेमागृहांमधील दरवाज्यांच्या हँडलवर एंट्री मायक्रोबियल शीट बसविण्यात आली आहे.