- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)
ताली’ ही वेबसीरिज आहे, तर ‘हड्डी’ हा सिनेमा. मात्र, या दोन विषयांनी मुंबईतील ट्रान्सजेंडरचे जग हलवून टाकले आहे. ‘ताली’ सीरियल कशी आहे? किंवा ‘हड्डी’ सिनेमा कसा बनवला? हा आजच्या लेखाचा विषय नाही. मात्र, दोन टोकाच्या दोन भूमिका मांडणाऱ्या या कलाकृतीमुळे ट्रान्सजेंडर समाज टोकाचा अस्वस्थ आहे. ज्या काळी या समाजाला लोक तिरस्काराच्या नजरेने पाहायचे. त्यांच्याविषयी नको त्या गोष्टी सांगायचे. त्या काळात गौरी सावंत पुढे आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. हा संघर्ष आणि गौरी सावंत यांची बायोग्राफी ‘ताली’ मालिकेतून दाखवली आहे. रवी जाधव या अत्यंत संवेदनशील दिग्दर्शकाने ही मालिका तितक्याच संयमाने बनवली आहे. ज्यांनी कोणी ही मालिका पाहिली त्यांचा ट्रान्सजेंडर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला आहे. ती देखील आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांनाही भावना आहेत. मन आहे. हे अतिशय उत्तमपणे या मालिकेतून मांडले गेले.
ही मालिका मोठ्या प्रमाणावर पाहिली जात असतानाच नवाजुद्दीन सिद्दिकी याची प्रमुख भूमिका असणारा ‘हड्डी’ नावाचा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. ‘ताली’ मालिकेने ट्रान्सजेंडर समाजाला काही वर्षे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘हड्डी’ सिनेमाने याच समाजाला पुन्हा आणखी काही वर्षे मागे ढकलून दिले आहे. मुळात आपल्याकडे ट्रान्सजेंडर समाजाविषयी किन्नर किंवा हिजडा हे शब्द वापरले जातात. त्यांच्यापासून चार हात दूर राहण्याची वृत्ती जुनीच आहे. टाळ्या वाजवत रस्त्याच्या कडेने भीक मागण्याचे काम करणाऱ्या महिलांमुळे निर्माण होणारी भीती हा सार्वत्रिक अनुभवाचा विषय. मात्र, या समाजातल्या महिलांना नोकरी करायची आहे.
चांगले शिकायचे आहे. त्यांना देखील मुख्य प्रवाहात यायचे आहे. ही भूमिका घेत गौरी सावंत यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. तो लढा यशस्वी झाल्यानंतरही या लोकांना समाज स्वीकारायला तयार नाही. अशा वातावरणात ‘हड्डी’सारखा सिनेमा तृतीयपंथींचे अत्यंत विकृत चित्रण करतो. मेलेल्या माणसांची हाडे विकण्याचे काम तृतीयपंथी करतात, असे दाखवतो. तृतीयपंथी लोक सतत कुणाचा ना कुणाचा तरी खून करत फिरतात असे चित्र रंगवतो तेव्हा गौरी सावंत, सलमा खान यांच्यासारख्या अनेकांनी जो लढा चालवला, त्या लढ्याला काही वर्षे हा सिनेमा मागे घेऊन जातो.
तृतीयपंथी रस्त्याच्या कडेला सिग्नलवर टाळ्या वाजवत उभे राहतात. मात्र, त्यांना टाळ्या वाजवण्याची वेळ आणली कोणी? हे मात्र आपला समाज सोयीस्कर विसरतो. आर्टिकल ३७७ रद्द होऊन पाच वर्षे झाली. तरी देखील या वर्गाला न्याय मिळत नाही. आधार कार्डात तृतीयपंथी अशी वेगळी ओळख दिली. मात्र, त्यांना बाकीचे हक्क, अधिकार दिले जात नाहीत. महाराष्ट्रात २०१४ पासून पोलिस भरतीचा विषय प्रलंबित आहे. ७० तृतीयपंथींनी पोलिस भरतीची परीक्षा दिली. मात्र, त्यांना नोकरी मिळाली नाही. मॅटने देखील त्यांना नोकरी द्या, असे आदेश दिले. तरीही पुरोगामी महाराष्ट्रात हे होत नाही. अन्य राज्यांनी त्यांना हे अधिकार दिले. पण, ते अधिकार द्यायला महाराष्ट्र का तयार नाही, हा प्रश्न कोणीही विचारत नाही. पोलिस भरतीत नाकारल्या गेलेल्यांना रस्त्यावर भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय तरी आपण ठेवला आहे का? या समाजासाठी गौरी सावंत यांनी ‘आजीचं घर’ नावाची संस्था चालवली आहे.
काही वर्षांपूर्वी तृतीयपंथींना समाज स्वीकारायला तयार नव्हता ती स्वीकृती हळूहळू आता कुठे रुजू लागलेली असताना ‘हड्डी’सारख्या सिनेमाने या समाजाचे जे चित्रण केले ते या समाजात नैराश्य निर्माण करणारे आहे. एकट्या मुंबईत ५० हजारांवर तृतीयपंथी आहेत. २०११ मध्ये देशात केलेल्या सर्व्हेनुसार ४ लाख १८ हजार तृतीयपंथी होते. २०२३ वर्ष सुरू आहे. या समाजाची संख्या वाढली आहे. त्यासोबतच शिक्षित होण्याचे प्रमाणही वाढले. रस्त्यावर टाळ्या वाजवून भीक मागण्यापेक्षा ‘आम्हाला नोकरी द्या, हक्काचे काम द्या, आम्हाला देखील इतरांसारखे जगायचे आहे’, असे म्हणत पुढे येणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, एखादा भिकार गल्लाभरू सिनेमा येतो आणि तो सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवतो हे योग्य नाही.
सलमा खान या ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्डाच्या उपाध्यक्ष आहेत. लोक अदालतीच्या पॅनलिस्ट आहेत. कॉमर्स ग्रॅज्युएट, एमएसडब्ल्यू शिकलेल्या सलमा खान यांनी पीएचडी केली आहे. या सिनेमामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणावर त्या संतप्त झालेल्या आहेत.
राज्यात महिला सुधारगृह आहेत. तसे किन्नर सुधारगृह का नाहीत? महिला बचत गटांसारखे किन्नरांसाठीचे बचत गट का नाहीत? आम्ही देखील पापड, लोणची करू. शिक्षण घेऊ. मात्र, आम्हाला नोकरी कोण देणार? आमची पापड, लोणची कोण विकत घेणार? हा सिनेमा ट्रान्सजेंडर समाजाला बदनाम करणारा आहे. या सिनेमाच्या निर्माता, दिग्दर्शकावर गुन्हेच दाखल केले पाहिजेत. - सलमा खान, उपाध्यक्ष, ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड
‘ताली’ ही मालिका माझ्या जीवनावर असली तरी ती माझ्या समाजाच्या व्यथा वेदना मांडण्याचे काम करते. आमच्या समाजाविषयी जनभावना चांगली होत असताना, हा सिनेमा आला. या सिनेमाने आमच्या प्रयत्नांना काही वर्षे मागे नेले आहे. पण, आम्ही आमचे प्रयत्न नेटाने चालू ठेवू. - गौरी सावंत (ग्रॅज्युएट),अध्यक्षा, आजीचे घर