Join us

सिनेलेखक सागर सरहदी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 AM

मुंबई : कभी कभी, सिलसिला, नूरी, बाजार सारख्या चित्रपटांचे ख्यातनाम सिने लेखक सागर सरहदी यांचे सोमवारी मध्यरात्री सायन येथील ...

मुंबई : कभी कभी, सिलसिला, नूरी, बाजार सारख्या चित्रपटांचे ख्यातनाम सिने लेखक सागर सरहदी यांचे सोमवारी मध्यरात्री सायन येथील निवासस्थानी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. ते अविवाहित होते. सरहदी यांच्या पार्थिवावर सायन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरहदी यांची तब्येत गेले काही दिवस बिघडलेली होती. त्यातच त्यांनी जेवणखाणही सोडले होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी अतिशय शांतपणे या जगाचा निरोप घेतला, अशी माहिती सरहदी यांचे पुतणे चित्रपट दिग्दर्शक रमेश तलवार यांनी दिली.

पाकिस्तानमधील एबोटाबाद शहरानजीकच्या बाफ्फा येेथे गंगासागर तलवार यांचा जन्म झाला. वयाच्या १२ व्या वर्षी ते दिल्लीत स्थलांतरित झाले. सरहदी या नावाने त्यांनी उर्दू लघु कथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या लघु कथांना चांगलीच लोकप्रियता लाभली होती.

१९७६ मध्ये यश चोप्रा यांच्या कभी कभी या चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नुरी (१९७९) ची पटकथा त्यांनी लिहिली. पुढे चोप्रा यांच्याच सिलसिलाची पटकथा आणि चांदनी या सिनेमाचे संवाद लेखन त्यांनी केले. स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक शाह आणि फारुख शेख यांना घेऊन त्यांनी बाजार (१९८२) या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन केले. दिवाना (१९९२) आणि कहो ना प्यार है (२०००) या सिनेमांचे संवाद लेखन सरहदी यांचेच आहे. चौसर आणि लोरी या सिनेमांची निर्मितीही त्यांनी केली होती.

...

श्रद्धांजली

सागर सहरदी हे ज्येष्ठ नाट्य आणि चित्रकर्मी होते. कभी कभी, नुरी, बाजारसारखे सिनेमे त्यांनी केले. त्यांच्या परिवाराच्या दुखात मी सहभागी आहे.

- जावेद अख्तर, कवी

सागर सरहदीजी यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. कहो ना प्यार है चे संवाद त्यांनी लिहिले होते. त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋणी राहीन.

- हृतिक रोशन, अभिनेता

..