सिनेकलाकारांना पडली राणीच्या बागेची भुरळ, तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:09 AM2018-02-11T05:09:05+5:302018-02-11T05:09:17+5:30
हिंदी-मराठी सिनेकलाकारांना सध्या राणीच्या बागेची ओढ लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण येथे सुरू असलेल्या उद्यान प्रदर्शनाला ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल अशा दिग्गज कलाकारांनी भेटी देत, प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृतींचे कौतुक केले आहे.
मुंबई : हिंदी-मराठी सिनेकलाकारांना सध्या राणीच्या बागेची ओढ लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण येथे सुरू असलेल्या उद्यान प्रदर्शनाला ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल अशा दिग्गज कलाकारांनी भेटी देत, प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृतींचे कौतुक केले आहे.
राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) ९ फेब्रुवारीपासून महापालिकेचे तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन सुरू झाले आहे. पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेले डॉल्फिन, जलपरी, स्टारफिश, आॅक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा इत्यादींच्या प्रतिकृतींसह कृत्रिम नदी आणि फुलांनी भरलेला काश्मिरी ‘शिकारा’ या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
गेल्या २ दिवसांत ७५ हजार मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. आज रविवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, ते सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांसाठी हे विनामूल्य खुले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
या वर्षी जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून, पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील यामध्ये समाविष्ट आहे.
यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, आॅक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा यांसारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात आहेत.
कलात्मक पुष्परचना : प्रदर्शनात फळझाडे, फळभाज्या, परड्या, टोपल्या, कुंड्यांमध्ये वाढविलेली मोसमी/हंगामी फुलझाडे, कुंड्यांमधील झाडे, गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, शोभिवंत झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना आदी संकल्पना साकारण्यात आल्या आहेत.
वृक्षतोड कमी करून, पर्यावरणाची हानी टाळण्यासह मुंबईकरांमध्ये झाडे, फुले, फळे आदींचे आकर्षण निर्माण करण्यासाठी ‘झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यान विद्याविषयक कार्यशाळा’ हा उपक्रम अत्यावश्यक आहे. जगभरातील १९७ देशांच्या भरलेल्या परिषदेत पर्यावरणावर चिंता व्यक्त करण्यात आली असून वृक्ष जपले, तरच प्राणवायूचे प्रमाण वाढून मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर.