नवीन पनवेल अडकले समस्यांच्या चक्र व्यूहात
By Admin | Published: July 18, 2014 12:52 AM2014-07-18T00:52:11+5:302014-07-18T00:52:11+5:30
नवीन पनवेल वसाहतीकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे
कामोठे : नवीन पनवेल वसाहतीकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडको विरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी २५ जुलै रोजी सिडको प्रशासनास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मंगळवारी सायंकाळी याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक सीता पाटील, मावळ लोकसभा युवक कॉ. अध्यक्ष किशोर चौतमल, कॅप्टन तलवारसिंह आदि उपस्थित होते.
सिडकोने कळंबोलीबरोबर नवीन पनवेल वसाहत सर्वात अगोदर विकसित केली आहे. सुरुवातीला सिडकोच्या घरांपुरतीच मर्यादित असलेली नवीन पनवेल वसाहत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. एकूण २० सेक्टरमध्ये विकसित करण्यात आलेल्या नोडमध्ये रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचा प्रश्नही अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे.
वसाहतीमध्ये नागरिकांकडून सिडको कर वसूल करते. त्यामुळे नागरिकांना प्राथमिक गरजा पुरवल्या जाव्यात ही सिडको प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु वारंवार भेट, बैठका, चर्चाद्वारे सूचित करून सुद्धा सिडको अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला आहे. कचरा अनियमितपणे उचलला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या ढिगाऱ्याचे फोटो काढून संबंधीत अधिकाऱ्यांना पाठविले व त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्या अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला नेवून त्यांनी ती परिस्थिती सुद्धा प्रत्यक्ष दाखवून दिली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कचऱ्याबरोबरच पाण्याच्या प्रश्नानेही नवीन पनवेलमध्ये डोके वर काढले आहे. मागणीनुसार पाणीपुरवठा होत नसल्याने वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. त्याचबरोबर एमजेपीचा वारंवार बिघाड त्यामुळे घेतले जाणारे शटडाऊन यामुळे नवीन पनवेलकरांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दाही शेट्टी यांनी उपस्थित केला. पुरुषांबरोबर अनेक कुटुंबांतील महिला नोकरी करतात. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे संबंधीत चाकरमानी महिलांना गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आणि इतर सहकाऱ्यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. येत्या २० जुलैपर्यंत प्रशासनाने हे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. (वार्ताहर)०