मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
By Admin | Published: September 13, 2016 04:41 AM2016-09-13T04:41:52+5:302016-09-13T04:41:52+5:30
सातबारा उताऱ्यावर बँकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी पुनाडे येथील एका शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाड तालुक्यातील नाते विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याला
महाड : सातबारा उताऱ्यावर बँकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी पुनाडे येथील एका शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाड तालुक्यातील नाते विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे शहरातील काकरतळे येथील उभा मारूती चौकात भर रस्त्यातच हा मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळयात सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रकाश हरी भोईर असे या पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो काकरतळे येथे एका इमारतीत रहतो. लाचलुचपत विभागाचे डिवायएसपी विवेक जोशी, पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १२.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पुनाडे येथील स्वानंद कोरपे या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. कोरपे यांनी घेतलेल्या बँकेच्या कर्जाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी प्रकाश भोईर यांनी कोरपे यांच्याकडे पाच हजार रु पयांची मागणी केली होती. त्याबाबत मंगळवारी सकाळी कोरपे व भोईर यांच्यात झालेल्या बोलण्याचे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रेकॉर्डही केले. त्यानुसार झालेल्या चर्चेत चार हजार रु पयांवर हा सौदा ठरला.
दुपारी चार हजार रुपयांची रक्कम कोरपे यांच्याकडून स्विकारताना सापळा रचलेल्या लाचलुचपतच्या पथकाने भोईरला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शहर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. (वार्ताहर)