मंडळांना सात दिवसांत परवानगी
By admin | Published: August 18, 2015 03:11 AM2015-08-18T03:11:02+5:302015-08-18T03:11:02+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या हातात पोलिसांची परवानगी असल्यास मंडळांना महापालिका अवघ्या सात दिवसांत परवानगी देणार असल्याची माहिती महापालिका
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या हातात पोलिसांची परवानगी असल्यास मंडळांना महापालिका अवघ्या सात दिवसांत परवानगी देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिली.
श्रावण महिन्याची सुरुवात झाली की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू होते. गणेशोत्सवाची तयारीची सुरुवात ही परवानग्या घेण्यापासून होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. या परवानग्या मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. अनेक मंडळांचे काही दिवस या परवानग्या मिळवण्यातच निघून जातात. पण, मंडळांना आता दिलासा मिळणार आहे. पोलिसांची परवागी असल्यास अवघ्या सात दिवसांत पालिका मंडपांना परवानगी देणार आहे. आतापर्यंत १९५ मंडळांना परवानगी देण्यात आल्या आहेत. तर १४४ मंडळांनी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नसल्यामुळे पालिका अद्याप त्यांना परवानगी दिलेली नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांकडून मंडप, लाऊड स्पीकर, मनोरंजनाचे कार्यक्रम, आगमन-विसर्जन आदी प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात. तर वाहतूक पोलिसांकडून आगमन - विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी घ्यावी लागते. मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ११ हजार ५५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी परवानगी दिल्यावरच महापालिका परवानगी देणार आहे. यामुळे मंडळांना परवानगीसाठी थांबावे लागेलच. यापेक्षा पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेने एकत्र आले पाहिजे. ज्या मंडळांना गेल्या वर्षी परवानगी दिल्या होत्या, त्यांना यंदा कमी वेळात परवानगी कशा मिळतील? याचा विचार केला पाहिजे. मंडळांना परवानगी मिळल्यावर गर्दीचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतील, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)