फार्मसी शिक्षण संस्थांचे वाढते पेव रोखण्यासाठी परिपत्रक, पुढील पाच वर्षे संस्थेला मान्यता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:47 AM2019-07-19T05:47:35+5:302019-07-19T05:47:43+5:30
देशात सध्या १ हजार ९८५ डी. फार्मा तर १ हजार ४३९ बी. फार्माच्या शैक्षणिक संस्था आहेत.
मुंबई : देशात सध्या १ हजार ९८५ डी. फार्मा तर १ हजार ४३९ बी. फार्माच्या शैक्षणिक संस्था आहेत. या दोन्हीची वार्षिक विद्यार्थी क्षमता २ लाख १९ हजार २७९ इतकी आहे. सध्याची विद्यार्थीसंख्या ही देशातील लोकसंख्येच्या गरजेला आवश्यक असे फार्मासिस्ट पुरविण्यासाठी पूरक आहे. वाढणाऱ्या शैक्षणिक संस्थांमुळे पात्र आणि प्रशिक्षित प्राध्यापकांची वानवा भासत असून त्यामुळे दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून पुढील पाच वर्षांत कोणत्याही फार्मसी शैक्षणिक संस्थेला मान्यता न देण्याचे परिपत्रक फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाकडून बुधवारी जारी करण्यात आले आहे.
९ आणि १० एप्रिल २०१९ रोजी १०६ व्या फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या केंद्रीय कौन्सिल बैठकीत देशात फार्मसी महाविद्यालयांचे वाढणारे पेव यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सध्या देशातील फार्मसी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे फार्मासिस्ट देशाच्या लोकसंख्येच्या गुणोत्तराला पुरेसे आहेत. शिवाय देशातील खासगी आणि शासकीय क्षेत्रात पुरेशा नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती सदर परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
हे परिपत्रक जारी करण्यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाशी फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाची बोलणी झाली असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच याची प्रत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेलाही पाठविण्यात आली आहे.
>हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. कारण गेल्या १० वर्षांपासून भरमसाठ फार्मसी कॉलेजेसना मान्यता देत बेरोजगार तरूणांची फौज तयार करण्याचे काम फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाने केले आहे.
कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्टस असोसिएशन