मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतरही संसर्गाचा धोका असल्याने त्या मृतदेहाचे आगीत दहन करावे, अशा मार्गदर्शकतत्त्वा प्रमाणे महापालिका प्रशासनाने परिपत्रक काढले होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात मृतदेह दफन करण्याची परंपरा असल्याने राज्य मंत्री नवाब मलिक यांनी पालिका आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर काही तासांतच पालिकेने हे परिपत्रक मागे घेतले. नव्या परिपत्रकानुसार कोरोना व्हायरस आजूबाजूला पसरणार नाही, एवढी मोठी दफनभूमी असल्यास मृतदेह दफन करण्याची परवानगी मिळेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबात जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार पालिका आयुक्तांनी सोमवारी परिपत्रक काढून कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला अग्नी देणे बंधनकारक केले होते. त्यानुसार मृतदेहाला रुग्णालयातून जवळील स्मशानभूमीत नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. या अंत्यसंस्कारासाठी पाचपेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच मृतदेहाला हात लावण्यास मनाई केली आहे.
राज्य मंत्री नवाब मलिक यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी रात्री हे परिपत्रक मागे घेऊन सुधारित परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकाला मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकडून होणारा विरोध लक्षात घेऊन पालिकेने त्यात काही बदल केले आहेत. मृतदेह दफन करायचा असल्यास कोरोना व्हायरस आजूबाजूला पसरणार नाही, एवढी मोठी दफनभूमी असावी, अशी अट घालण्यात आली आहे.