बारावीचा निकाल ९९.९४ टक्के, २ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएससीई मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या मंडळाची देशातील दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९८ टक्के तर बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.७६ टक्के आहे. तर राज्यातील आयसीएसई मंडळाचा दहावीचा एक विद्यार्थी वगळता बाकी सर्व उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल १०० टक्के तर बारावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे.
राज्यात एकूण २४,३५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २४,३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी परीक्षेसाठी ३,४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३,४२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा राज्यातून सीआयएससीई दहावीसाठी (आयसीएसई) २३४ शाळांमधून तर बारावीसाठी (आयएससी) ५३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीच्या १०० टक्के निकालात परीक्षेला बसलेल्या मुलांची संख्या १३ हजार ३१४ तर मुलींची संख्या ११ हजार ४५ इतकी होती. आयसीएसई (बारावी)च्या निकालात परीक्षेला बसलेल्या मुला-मुलींची संख्या अनुक्रमे १,६५० आणि १,७७७ इतकी आहे.
दहावी, बारावीत मुलींचा निकाल १०० टक्के
सीआयएससीई मंडळाच्या दहावीच्या निकालात मुलींचा निकाल १०० टक्के लागला असून, मुलांचा निकाल ९९.९९ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १०० टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.८८ टक्के इतकी आहे.
आयसीएसई - १०० टक्के
एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या- २४,३५९
मुले - १३,३१४ - ५४.६६ टक्के
मुली - ११,०४५ - ४५.३४ टक्के
आयसीएसई - ९९.९४ टक्के
एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या - ३४२७
मुले - १६५० - ४८.१५ टक्के
मुली - १७७७ - ५१.८५ टक्के