ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज अर्थात कळवा रुग्णालयात उपचारासासाठी येणाऱ्या रुग्णांना आता माफक दरात सीटीस्कॅन आणि एमआरआयची सुविधा पीपीपी तत्त्वावर ठाणे महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. खाजगी संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा सुरु केली जाणार असून या संदर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.कळवा रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा नसल्याने अतिगंभीर रुग्णांना आजाराचे निदान होण्यासाठी खाजगी रुग्णालयात पाठवावे लागते. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने या सुविधा एकाच छताखाली सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ही सुविधा पीपीपी तत्त्वावर सुरु केली जाणार असून या मशिन्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधींत संस्थेची असणार असून निगा देखभालही त्यांनाच करावी लागणार आहे. तसेच वर्षाच्या ३६५ दिवस २४ तास ही सुविधा रुग्णांसाठी त्यांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. यासाठी रुग्णालयात जागेसह वीज, पाणी आदीही पालिकाच उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना अल्प दरात ही सुविधा पुरवावी लागणार आहे. महापालिकेने करार केल्या तारखेपासून तो संपुष्टात येईपर्यंत सुविधा केंद्र चालू ठेवण्यासाठी तेथे आवश्यक असणारे मनुष्यबळ यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, लिपीक, परिचारीका, प्रसाविका, आवश्यक तांत्रिक कर्मचारी नेमणे, वर्ग ३, व वर्ग ४ चे कर्मचारी यांच्या सेवा ३ सत्रामध्ये उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी पीपीपी पार्टनर यांची राहणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रचलित शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन अदा व भत्ते अदा करणे ही जबाबदारी त्यांचीच असणार आहे. दरम्यान करारनामा हा किमान १० वर्षांचा असणार आहे. त्यानंतर ५ वर्षे कालावधीसाठी संस्थेचे काम समाधानकारक असल्यास, पालिका आयुक्तांच्या मान्यतेने मुदतवाढ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गोरगरीबांना वेळेत आजाराचे निदान होऊन उपचार होतील अशी आशा आहे. (प्रतिनिधी)
कळवा रुग्णालयात सीटीस्कॅनची सुविधा
By admin | Published: September 22, 2015 12:18 AM