मुंबई - सोमवारी रात्री लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. दरम्यान, काल या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ विभागणी केली गेली आहे. त्यामुळे कुणाला शंका घेण्यास वाव मिळू नये म्हणून आम्ही लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला. या विधेयकात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. तसेच याबाबत जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत मतदान करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लोकसभेत मांडल्या गेलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे या विधेयकाबाबत अधिक माहिती घेतली पाहिजे. जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या लोकांने हे विधेयक खरोखरच कळले आहे का, हा पण प्रश्नच आहे. बाहेरून येणारे नागरिक कुठे राहणार, त्यांची जबाबदारी कोण घेणार, हे निश्चित झाले पाहिजे. मात्र शिवसेना कुठल्याही गोष्टीसा आंधळेपणाने विरोध करणार नाही, तसेच कुणाला बरं वाटावं आणि कुणाला वाईट वाटावं म्हणून शिवसेना भूमिका घेत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावश्यक मुद्यांवर सरकारने अधिक लक्ष द्यावे, नकोत्या प्रश्नांत गुंतवून मुद्दे भरकटवू नयेत , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ''नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जर देशातील नागरिक घाबरत असतील, तर त्यांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे,''असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
''देशामध्ये जे एक वातावरण केलं जात आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणलं जातं, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे,''असेही उद्धव ठाकरे म्हणाले.