डोकेदुखी, आणि अतिसाराने त्रासाने नागरिक हैराण
By संतोष आंधळे | Published: May 1, 2024 08:38 PM2024-05-01T20:38:39+5:302024-05-01T20:38:49+5:30
कडक उन्हाळ्याचा परिणाम.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान वाढले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता त्यासोबत काहींना उन्हामुळे डोकेदुखी आणि जुलाबाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहे. त्यासोबत काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होत होत आहे. मात्र, याला विषाणूचा संसर्ग जबाबदार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अजून काही काळ उष्णतेची लाट राज्यभर असणार आहे. त्याचा मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून विशेष काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. मुंबईत उष्माघाताचे रुग्ण अद्याप सापडले नसले, तरी अति उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. अति उन्हामुळे उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी सजग राहावे, असे सांगताना महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत उष्माघात बाधितांवरील उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १४ रुग्णालयांत शीत कक्ष रुग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास हे करा?
- पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
- त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात, सावलीत आणावे.
- थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा. सैल कपडे वापरावेत.
- उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
- उष्माघातासारखे वाटल्यास जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
अशी काळजी घ्या
- डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शक्यतो घरात राहावे
- पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला.
- पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
अतिउष्णतेमुळे अतिसार आणि डोकेदुखी होत असल्याचे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. या काळात शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवले पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणत घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरातील क्षार कमी होतात. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परिणामी, चक्कर येणे, मळमळ होणे या आजारांचा सामना करावा लागतो. रस्त्यावर उपलब्ध होणारी शीतपेये टाळली पाहिजेत. विशेष म्हणजे, विषाणूच्या संसर्गामुळे घसादुखीच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. त्यावेळी त्यांना लक्षणे बघून त्यावर उपचार केले पाहिजे.
- डॉ.विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय.