दहिसरमधील ‘गल्ल्यांचे सील’ नागरिकांनी तोडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:59 AM2020-08-22T01:59:53+5:302020-08-22T02:09:56+5:30
गणेशोत्सवादरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी पालिका करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई : उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या परिसरात दहिसरचादेखील समावेश आहे. गर्दी आणि घोळके कमी करण्यासाठी दहिसर परिसरात पालिकेने गल्ल्यांना केलेले सील नागरिकांनी तोडून टाकले. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी पालिका करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दहिसरमध्ये गणपत पाटीलनगर, आंबेवाडी, केतकीपाडाच्या काही चाळी तसेच अजून काही परिसरात अनेक लहान गल्ल्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रभाव या परिसरात वाढला तेव्हा सुरक्षेचा उपाय म्हणून पालिकेच्या आर उत्तर विभागाने अनेक गल्ल्या सील केल्या.
या गल्ल्यांमुळे नागरिक घराच्या बाहेर पडून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम मोडत असल्याचे उघड झाले होते. पालिकेच्या या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोडवण्यात मदत झाली. मात्र आता गल्ल्यांतील सील उघडल्याने पुन्हा लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते फारच घातक ठरू शकते, अशी चिंता पालिकेला आहे. त्यानुसार आता पालिका पुन्हा त्या गल्ल्या सील करण्यास सुरुवात करणार असून, येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे. पोलिसांना बंदोबस्त ठेवण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यासाठीच एक पत्र पालिकेच्या आर उत्तर विभागाकडून दहिसर पोलिसांना पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचे विघ्न रोखण्यात मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला गेला.
>महापालिकेला चिंता
या गल्ल्यांमुळे नागरिक घराच्या बाहेर पडून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम मोडत असल्याचे उघड झाले होते. पालिकेच्या या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोडवण्यात मदत झाली.
मात्र आता गल्ल्यांतील सील उघडल्याने पुन्हा लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते फारच घातक ठरू शकते, अशी चिंता पालिकेला आहे़