Join us

कुलाबा, बीकेसी, चेंबूरमध्ये नागरिकांचा श्वास कोंडला! मुंबईच्या प्रदूषणात मेट्रोचाही हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 6:07 AM

प्रदूषणासमोर प्राधिकरणाचा निभाव लागेना; नागरिकांचा श्वास कोंडला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा घसरला असून मंगळवारी चेंबूर, कुलाबा आणि बीकेसी या तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कुलाबा आणि बीकेसी येथील हवेची गुणवत्ता ढासळत असून या ठिकाणी प्रदूषणाची ‘धूळ’वड सुरू असल्याने नागरिकांचा मात्र श्वास कोंडल्याचे पाहायला मिळत आहे.

हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका यांच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करत कारवाई करण्यास सुरुवात झाली असली तरी देखील वाढत्या प्रदूषणासमोर प्राधिकरणाचा निभाव लागत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे वाढली धूळवड

  • चेंबूर - येथे केमिकल कारखाने असून, याचा गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
  • कुलाबा - भुयारी मेट्रो ३ आणि इतर अनेक बांधकामे येथे सुरू आहेत. त्याची धूळ वातावरणात मिसळत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढत आहे.
  • बीकेसी -मेट्रो २ चे काम सुरू आहे. त्यामुळे याची धूळ आणि वाहन प्रदूषण तापदायक ठरत आहे. 

मुंबईच्या प्रदूषणात मेट्रोचाही हातभार, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजनाच नाही

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एमएमआरडीए शहरभर मेट्रोचे जाळे विणले आहे. मेट्रोची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, मुंबईच्या वाढत्या प्रदूषणात मेट्रोची ही बांधकामे भर घालत आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याने बांधकामाची धूळ हवेत पसरत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मानखुर्द मंडाळे ते अंधेरी डी. एन. नगरदरम्यान ‘मेट्रो-२ बी’ धावणार असून, या प्रकल्पाचे काम जोरदार सुरू आहे. २३ किमी लांबीच्या या मार्गात २० स्थानके असून, मंडाळे येथे कारशेड डेपो उभारण्याचे कामदेखील सुरू आहे. या ठिकाणी दिवस-रात्र सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रचंड धूळ हवेत पसरत असून, ही धूळ हवेत पसरून प्रदूषण होऊ नये, यासाठी बांधकामाच्या ठिकाणी तसेच येथील रस्त्यांवर सकाळ संध्याकाळ पाण्याची फवारणी करण्यात येत, असे मात्र गेले काही दिवस हे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे प्रदूषणात आणखीनच भर पडत आहे.

मुंबईतल्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांच्याकडून तत्काळ दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.- मिलिंद पांचाळ

हिवाळ्यातील हे प्रदूषण नियमित झाले आहे. प्रदूषण वाढले की, कारवाई करणे हा उपाय नाही. वर्षभर प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने उपाय योजले पाहिजेत.- विनोद घोलप

टॅग्स :मुंबईमेट्रोवायू प्रदूषण