नवी मुंबई : वाशी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या केड्राई-बीएएनएमच्या पंधराव्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत जवळपास दीड लाख ग्राहकांनी भेट देऊन घर खरेदीबाबत चाचपणी केली.
मागील काही वर्षापासून रियल इस्टेट मार्केटवर मंदीचे सावट आहे. त्यामुळे विकासकांत चिंतेचे वातावरण होते. मात्र आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अडसर दूर झाला असून दळणवळणाच्या इतर प्रकल्पांनाही अप्रत्यक्षपणो चालना मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून मरगळलेल्या रियल इस्टेट मार्केटला उभारी मिळण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भरविण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहून जाणकारांचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. या प्रदर्शनात जवळपास पावणो दोनशे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यात विविध विकासकांचे सहाशे पेक्षा अधिक गृहप्रकल्प मांडण्यात आले आहेत. यात 12 लाखांपासून 2 कोटी रूपयार्पयतच्या मालमत्तेचा आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात नवी मुंबईसह ठाणो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हय़ातील आकर्षक गृहप्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. असे असले तरी पनवेल तालुक्यातील उलवे, खोपोली, रोडपाली, तळोजा या सिडकोच्या नयना क्षेत्रतील गृहप्रकल्पांना ग्राहकांकडून अधिक विचारणा होत असल्याची माहिती बीएएनएमचे सेक्रेटरी धर्मेद्र कारिया यांनी लोकमतला दिली. छोटय़ा घरांबाबत नागरिक अधिक चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)