सुधार समिती अध्यक्षपदावर नगरसेविकांचा दावा
By admin | Published: March 14, 2017 04:30 AM2017-03-14T04:30:12+5:302017-03-14T04:30:12+5:30
स्थायी समितीप्रमाणे सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
मुंबई : स्थायी समितीप्रमाणे सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. महत्त्वाच्या या समितीमध्ये तीन माजी महापौरांची सदस्यपदी वर्णी लागली आहे. तसेच शिवसेनेच्या महापालिकेतील उपनेत्याही शर्यतीत आहेत; या वेळेस महिला नगरसेवकांनी या पदावर दावा केला असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत रमेश कोरगावकर अव्वल ठरले. मात्र, कोरगावकर यांना उमेदवारी मिळाल्याने या पदाचे दावेदार मंगेश सातमकर नाराज होऊन महापालिका मुख्यालयातून निघून गेले. हीच परिस्थिती अन्य समिती अध्यक्षपदांची आहे. शिक्षण समितीमध्ये शीतल म्हात्रेला डावलून शुभदा गुडेकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.
आवश्यक संख्याबळ असूनही अध्यक्षपदावर दावा करणार नाही, असे भाजपाने जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजपासाठी सोडण्यात येणाऱ्या सुधार समिती अध्यक्षपदासाठी आता
शिवसेनेतूनच चढाओढ सुरू आहे. त्यात मिलिंद वैद्य, विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव या तीन माजी महापौरांची सदस्यपदी नेमणूक झाल्यामुळे चुरस आणखी वाढली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव अद्याप शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)सुधार समितीतील सदस्य
शिवसेना : श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, रमाकांत रहाटे, अनंत नर, स्वप्निल टेंबवलकर, किशोरी पेडणेकर, स्नेहल मोरे, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, किरण लांडगे.
भाजपा : उज्ज्वला मोडक, प्रकाश गंगाधरे, महादेव शिवगण, ज्योती अळवणी, शिवकुमार झा, सुनील यादव, सागरसिंह ठाकूर, योगीराज दाभाडकर, हरीश भांर्दिगे, जगदीश ओझा
काँग्रेस : विठ्ठल लोकरे, अश्रफ आझमी, जावेद जुनेजा
राष्ट्रवादी काँग्रेस : ज्योती हारुन खान
समाजवादी पक्ष : अब्दुल कुरेशी