जन्मदाखल्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:58 AM2020-01-31T00:58:30+5:302020-01-31T00:58:39+5:30
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले आणि विवाह नोंदणी केली जाते.
मुंबई : महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये गेल्या महिन्याभरात जन्माचा दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पूर्वीपेक्षा अर्जदारांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे विभाग कार्यालयातील आरोग्य खात्यावरील ताण वाढला आहे. विशेषत: भायखळा, वांद्रे, सांताक्रुज, कुर्ला, साकीनाका आणि खार अशा विभागांमध्ये जन्म दाखल्यांसाठी गर्दी वाढली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळेच ही वाढ दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले आणि विवाह नोंदणी केली जाते. सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत हे दाखले दिले जातात. यासाठी प्रत्येक विभागात दर महिन्याला सरासरी १००-१२५ अर्ज येत असतात. मात्र नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर
१ जानेवारीपासून जन्मदाखल्याच्या अर्जदारांमध्ये वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्यात सरासरी अडीचशे अर्ज येत असलेल्या कुर्ला आणि साकीनाका विभागातून डिसेंबर महिन्यात ३९८ अर्ज आले होते. तर भायखळा, नागपाडा या विभागातून सरासरी १२५ ते १५० ऐवजी आता दोनशे अर्ज आले आहेत. वांद्रे, खार, सांताक्रुझचा कारभार पाहणाऱ्या एच. पश्चिम विभागात सरासरी १५० अर्जात वाढ होऊन दररोज ३० ते ४० अर्ज जन्म दाखल्यांसाठी येत आहेत. डिसेंबरपासून अर्जात २० ते ३० टक्के वाढ झाली असल्याचे एका पालिका अधिकाºयाने सांगितले.
भायखळा विभाग कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. यासाठी समाजवादीचे स्थानिक नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी काही दिवसांपूर्वी विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना मदतीला घेऊन सर्व अर्जांचा निपटारा केला. तरी दुपार उलटून गेली, ही गंभीर बाब शेख यांनी निदर्शनास आणली.
कार्यालयांबाहेर दलालांचा सुळसुळाट
आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी यांचा जन्माचा दाखला उपलब्ध नसल्याचे काही दिवसांपूर्वी पालिकेने कळवले होते. अशी परिस्थिती बºयाच ठिकाणी असून नागरिकांना स्वत:च आपली कागदपत्रे शोधून घेण्यास सांगितले जात आहे. मात्र कार्यालयांबाहेर दलालांचा सुळसुळाट असून आठ दिवसांत ते कागदपत्रे मिळवून देत असल्याची माहिती काँग्रेसचे असिफ झकेरिया यांनी सांगितले. भायखळा विभागात दहाऐवजी आता शंभर अर्ज जन्म दाखल्यासाठी येत असल्याचे, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांनी सांगितले.
स्थायी समितीत गदारोळ
नागरिक सुधारणा कायदा आल्यामुळे नागरिकांना जन्म दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे. लोकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण आहे, असा आरोप हरकतीच्या मुद्द्याद्वारे समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीमध्ये केला. मात्र जन्म दाखल्यासाठी अर्ज वाढण्यास हा कायदा कारणीभूत नसल्याचा युक्तिवाद भाजप सदस्यांनी केला. यामुळे समाजवादी आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली.