गोराई गावातील नागरिकांना मिळणार मूलभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 07:24 PM2020-12-21T19:24:50+5:302020-12-21T19:25:00+5:30
Mumbai News: जागेसाठी डीपीत तरतूद करणे आदी महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत गोराई गावातील प्रश्न लवकर सोडवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक लवकर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस व डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: बोरिवली खाडीपलीकडे असलेल्या सुमारे 12000 लोकवस्तीच्या गोराई गावाला आजही स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर आरोग्य,शिक्षण,पाणी या मूलभूत सुविधा नाही. आज दुपारी पालिका परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या कांदिवली पश्चिम आर दक्षिण वॉर्ड मधील त्यांच्या दालनात माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी महत्वाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत गोराई गावात 24 तास आरोग्य सुविधा व डॉक्टर उपलब्ध करणे,येथील पाणी समस्यांचे निराकरण करणे, 108 नंबरच्या ऍम्ब्युलन्स
सुविधा देणे तसेच येथील शाळा व महाविद्यालयच्या
जागेसाठी डीपीत तरतूद करणे आदी महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत गोराई गावातील प्रश्न लवकर सोडवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक लवकर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस व डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
लोकमतने येथील समस्यांवर प्रकाशझोत टाकून पालिका व शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात लोकमत ऑनलाईन व लोकमतच्या दि,8 डिसेंबरच्या व दि,12 डिसेंबरच्या अंकात या संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दि,12 डिसेंबर रोजी गोराई गावाला भेट दिली होती. गोराई मथाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो,सचिव रॉकी किणी,सुनीता नागरे यांनी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. तर गोराई गावातील नागरिकांना सुविधा पुरवण्याची विनंती त्यांनी पालिका प्रशासनाला केली होती. सदर भेटीचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता.
आजच्या बैठकील डॉ.दीपक सावंत, आमदार विलास पोतनीस,प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे,आर मध्य बिभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे,आर मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बाबासाहेब कवळी,गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो,सचिव रॉकी किणी,राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे व गोराई रिसोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जोरम राजा कोळी,
रोटरी क्लब ऑफ दहिसर इस्टचे दिनेश झाला व गोराई गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
काय आहेत समस्या
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गोराई व लगतच्या कुलवेम व मनोरी ही तीन गावे मूलभूत व आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले आहे.आजही येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही,ऍम्ब्युलन्सची व बाळांतपणाची व डायलिसिसची सुविधा नाही. जर इमरजन्सीत कोणतीही आरोग्य समस्या उद्भवल्यास येथील नागरिकांना बोरिवलीला 20 ते 25 किमी वळसा घालून जावे लागते. यामध्ये नागरिकांचा प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत.गोराई गावात पालिकेचा दवाखाना आहे.सदर दवाखाना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरू असतो.त्यानंतर जर आरोग्य समस्या उद्भवल्यास डॉक्टर नसल्याने औषध उपचार होत नाही.त्यामुळे येथे 24 तास डॉक्टरची नितांत गरज असून सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची मागणी गोराईकरानी यावेळी केली.
येथील पालिकेचा दवाखान्याची जागा ही 1930 ची असून सदर जागा ही सीआरझेड मध्ये मोडत असल्याने दुरुस्ती करता येत नाही. पावसाळ्यात येथे पाणी तुंबत,त्यामुळे सदर वास्तूची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
पालिकेचा 2034 च्या नव्या डीपीत येथील कोळीवाडे अधोरेखित केले नाही. येथील नागरिकांना पाणी जोडणी हवी असेल आणि घर बांधणी करायची असेल तर पालिका पुरावा मागते. येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.
गोराई गावात 10 वी पर्यंत तर मनोरी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. येथे लॉ कॉलेजसाठी भूखंड राखीव होता. मात्र कॉलेज काही झाले नाही. येथें महाविद्यालयाची नितांत गरज आहे.