Join us

औद्योगिक प्रदूषणाचा नागरिकांना त्रास

By admin | Published: January 13, 2015 12:54 AM

कंपन्यांचा धूर व दूषित सांडपाण्यामुळे सानपाडा - जुईनगर येथील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : कंपन्यांचा धूर व दूषित सांडपाण्यामुळे सानपाडा - जुईनगर येथील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न उद्भवला असल्याने प्रदूषणाविरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.जुईनगर औद्योगिक पट्ट्यामध्ये असलेल्या कंपन्यांमधून मध्यरात्रीनंतर धूर सोडला जातो. या धुराचा त्रास औद्योगिक पट्ट्यालगतच असलेल्या सानपाडा व जुईनगर या रहिवासी क्षेत्रातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांमधील दूषित सांडपाणी नाल्यात सोडले जाते. हे पाणी रहिवासी क्षेत्रालगतच्या नाल्यांमधून वाहत जात असल्याने त्याच्या उग्र वासाचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रदूषणाचा हा प्रकार टाळण्यासाठी कंपन्यांकडून योग्य खबरदारी घेतली जावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विजय वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. त्याकरिता दोन दिवस नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आल्याचे विजय साळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)