मुंबई : गोवंडी, शिवाजीनगर येथील मुस्लीम समाजाच्या नागरिकांसाठी असलेल्या देवनार कब्रस्तानची मृतदेह दफन करण्याची क्षमता पूर्णत्वास गेल्याने गेल्या काही कालावधीपासून या कब्रस्तानचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लीमबहुल असलेल्या या परिसरातील नागरिकांना मृतदेह दफन करण्यासाठी घाटकोपर येथील छेडानगर येथील कब्रस्तानचा पर्याय निवडावा लागत आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांच्या सोयीसाठी या परिसरातील रफीनगरमध्ये नवीन कब्रस्तान तयार करण्यात आले असून त्याचा वापर येत्या २७ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत स्थानिक आमदार अबू आसिम आझमी यांनी या परिसराची पाहणी केली व रफीनगर येथील कब्रस्तानचे काम जलदगतीने करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. या कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्यास पुढील शुक्रवारी (ता. २७) पासून प्रारंभ होईल, अशी माहिती आझमी यांनी दिली.गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील लोकसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याने पूर्वीच्या देवनार येथील एकमेव कब्रस्तानवर मोठा ताण पडत होता.सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच कबर खणून त्यामध्ये दुसऱ्या मृतदेहाचे दफन करण्याची वेळ अनेकदा येत असे, त्यासाठी रफीनगर येथील दुसºया कब्रस्तानची मागणी करून प्रशासनाकडून त्यासाठी जागा मिळवण्यात आली होती.मात्र त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. आता, देवनार कब्रस्तानचा वापर सध्या पूर्णत: थांबल्याने रफीनगर येथील कब्रस्तानचे काम वेगाने करण्यात येत आहे.देवनार येथील जुन्या कब्रस्तानचे कामदेखील करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक आमदार अबू आझमी यांनी दिली. या कब्रस्तानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी अबू आझमी यांनी दिले आहेत.
देवनार येथील कब्रस्तानचा वापर बंद झाल्याने नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:14 AM