शुद्ध व स्वच्छ हवा मिळणे हा नागरिकांचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:10 AM2021-09-12T04:10:03+5:302021-09-12T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह देशातील १३२ नॉन अटेन्मेंट शहरांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर असणाऱ्या दिवसांमध्ये आरोग्यविषयक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह देशातील १३२ नॉन अटेन्मेंट शहरांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर असणाऱ्या दिवसांमध्ये आरोग्यविषयक इशारा देणारी यंत्रणा सुरू करण्यासाठी ऑनलाइन मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे शुद्ध व स्वच्छ हवा हा प्रत्येक शहरातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे यावर जोर दिला जात आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये शुद्ध हवेबाबत जागरूकता आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ७ सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून जाहीर केला. यासाठी सर्वांसाठी शुद्ध हवा ही पहिल्या वर्षाची संकल्पना होती. यावर्षीच्या इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईजचा विषय आरोग्यदायी हवा, आरोग्यदायी वसुंधरा - हेल्दी एअर हेल्दी प्लॅनेट असा आहे. खासकरून कोविड महामारीच्या काळात हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम त्यातून अधोरेखित करता येतील.
हवेच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम फक्त श्वसन अवयवांवरच होतात असे नाही, तर मेंदू तसेच अगदी प्रजननाशी संबंधित अवयवांवर देखील होतात, असे अभ्यास अहवालांनी यापूर्वीच दाखवून दिले. देशभरातील चार इन्स्टिट्यूट्सच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच एक देशव्यापी अभ्यास सर्वेक्षण केले असून, त्याचा हवा प्रदूषणाशी थेट संबंध होता. खराब हवा गुणवत्ता असलेल्या आणि पीएम २.५ चे उत्सर्जन अधिक असणाऱ्या परिसरातील लोकांना कोविडचा संसर्ग आणि त्या संबंधित मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल सांगतो.
बॉक्स
शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने अलीकडेच २०१९ मध्ये एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स - हवेचा गुणवत्ता जीवनमान निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार पीएम २.५ मुळे नागरिकांच्या वयोमानात राष्ट्रीय स्तरावर सरासरी घट झाली असून, महाराष्ट्रातील हे प्रमाण चार वर्षे आहे. शहरनिहाय पीएम २.५ च्या धोक्यानुसार पाहिल्यास पुण्यात ४.२ वर्षे, मुंबईत ३.७ वर्षे, तर विदर्भातील अनेक प्रदूषित जिल्ह्यांमध्ये ५ वर्षांनी लोकांचे आयुष्यमान कमी झाल्याचे आढळून आले.