Join us

आयुक्तांना हवे 'नशामुक्त शहर'; ड्रग्जच्या अड्ड्यांची मुंबईकरांनी दिली खबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 3:39 PM

मुंबईत पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर सतत कारवाई करण्यात येत आहे. मात्र असे असुनही यावर नियंत्रण मिळवण्यात अपेक्षित यश पोलिसांना आलेले नसून तरुण पिढीला याचा विळखा दिवसेंदिवस घट्ट बसत चालला आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: 'ड्रग्ज हा काळजी करण्यासारखा विषय असुन मुंबईला त्यापासून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र त्यासाठी नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी अशा आशयाचे  #नार्कोटिक्सफ्री मुंबई' ट्विट पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गुरुवारी सकाळी केले. त्यांच्या या ट्विटला मुंबईकरांनी उत्तर देत शहरात नशा करण्यात येणाऱ्या अनेक ठिकाणांची माहिती त्यांच्याकडे शेअर केली आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

मुंबईत पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर सतत कारवाई करण्यात येत आहे. मात्र असे असुनही यावर नियंत्रण मिळवण्यात अपेक्षित यश पोलिसांना आलेले नसून तरुण पिढीला याचा विळखा दिवसेंदिवस घट्ट बसत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांनी या समस्येची दखल घेत आम्ही कारवाई करतो तुम्ही माहिती द्या असे आवाहन नागरीकांना केले आहे. त्यांनी तसे ट्विटही केले असुन त्यानंतर लोकांनी बराच टीवटीवाट केला आहे. सदर ठिकाणचे फोटोही शेअर करत आयुक्तांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असुन यावर तुम्ही आमचे कान आणि डोळे बना अशी विनंती पांडे यांनी त्यांना केली. 

घाबरण्यास कारण की...आम्ही पोलीस ठाण्यात माहिती दिल्यास आमचे नाव आरोपींपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांच्या कडून आम्हाला त्रास देण्यास सुरुवात होईल अशी भीती देखील काहींनी आयुक्तांकडे व्यक्त केली.

डायल १०० आणि 'चिरीमिरी'मुंबई पोलिसांचा नियंत्रण कक्ष १०० वर फोन करून माहिती आम्ही देऊ. मात्र पोलीस त्याठिकाणी जाऊन चिरीमिरी घेऊन आरोपीला सोडून देण्याची शक्यता लोकांनी वर्तवली. तसेच छोट्या पेडलर्सवर हात न टाकता मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करा असाही सल्ला दिला गेला आहे.

'हॉटस्पॉट' वर हवी गस्त वांद्रेचे रेक्लेमेशन, जनरल ए के वैद्य मार्ग, गोवंडीचे शिवाजी नगर, रफिक नगर, डम्पिंग रोड, बैगनवाडी, गोवंडी रेल्वे स्थानक, लाल्लूभाई कंपाउंड, साठे नगर, गौतम नगर, मील्लतनगर, अंधेरी, ओशिवरा, लोखंडवाला बॅकरोडला जानकी देवी रोड हा मील्लतनगर पर्यंत, अंधेरी पश्चिमच्या ओबेरॉय स्प्रिंगजवळील शांतीवन रोड हे हॉटस्पॉट आहेत. तर खार पश्चिमच्या ऑटो रिक्षा पार्किंग अंधेरी पश्चिमच्या व्ही पी मार्ग आणि पालिराम रोड परिसरात पार्क ऑटोरिक्षामध्येही नशेचे प्रकार चालतात.

पवईच्या इडन मार्केटमध्ये 'दम मारो दम'पवई येथील इडन मार्केट या सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाची नशा करण्याची, उघडपणे दारू पिण्याची आणि सिगरेट फुकणे सुरू असते. मात्र सतत तक्रार करुन देखील यावर कारवाई केली जात नाही असा आरोप फोटो शेअर करत नागरिकांनी केला.