लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व, मोहन गोखले रोड येथील ना विकास क्षेत्रातील भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत वाहनतळ व अनधिकृत व्यवहाराविरोधात नागरिकांनी प्रभाग क्रमांक ५२च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी अनधिकृत वाहनतळाविरोधात स्थानिक नागरिकांनी पी दक्षिण महापालिका कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. नागरिकांच्या या संतप्त भावनेची दखल घेऊन बुधवारी भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर व नगरसेविका प्रीती सातम यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गोरेगाव प्रभाग क्रमांक ५२मधील नागरिकांच्या समवेत बुधवारी सकाळी ९ वाजता महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेकडो नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणा व अनधिकृत वाहनतळाला संरक्षण देण्याच्या कृतीविरोधात संताप व्यक्त करून महापालिका प्रशासनाविरोधात जवळपास एक तास घोषणाबाजी केली. यासंदर्भात आज ‘लोकमत’ने वृत्त दिले होते.
मौजे पहाडी, गोरेगाव सिटीएएस नंबर ५९६, मोहन गोखले रोड, धीरज वॅली टॉवर्स समोर नाविकास क्षेत्रातील राखीव भूखंडावर गेल्या अनेक महिन्यांपासून टाळेबंदीचा फायदा उठवून मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहनतळ उभा करण्यात आला असून, यासाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे या जागेवर अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होऊनसुद्धा आजही हा अनधिकृत वाहनतळ सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅनिटी व्हॅन व अन्य गाड्यांचे पार्किंग होत आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पालिका अधिकारी व आंदोलकांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक झाली. यामध्ये नगरसेविका प्रीती सातम भाजप उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, जोगेश्वरी विधानसभा अनंत परब, उत्तर पश्चिम जिल्हा युवा मोर्चा सचिन भिल्लारे व वार्ड क्र.५२चे अध्यक्ष मनोज पाल व नागरिक प्रतिनिधी, पदाधिकारी प्रशासनाच्या वतीने विशेष अधिकारी सोनावणे व इतर अधिकारी तसेच पोलीस अधिकारी दीपक फटांगरे, सहायक पोलीस आयुक्त हरीश गोस्वामी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये बैठक होऊन १५ दिवसाच्या आत सदर अनधिकृत वाहनतळ कायमस्वरूपी हटवला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
-----------------------------