सीबीडीत मार्केटवरून नागरिक - भाजीविक्रेते आमनेसामने
By admin | Published: February 25, 2015 03:58 AM2015-02-25T03:58:47+5:302015-02-25T03:58:47+5:30
पालिकेच्या दुर्लक्षामुळे गैरसोयींचा फटका बसलेले सीबीडीतील नागरिक आणि भाजीविक्रेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
नवी मुंबई : पालिकेच्या दुर्लक्षामुळे गैरसोयींचा फटका बसलेले सीबीडीतील नागरिक आणि भाजीविक्रेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पदपथ गिळंकृत करून रस्त्यावर आपले बस्तान मांडणा-या भाजी विक्रेत्यांकडून पदपथ मोकळे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर सुसज्ज मार्केट उपलब्ध करून देण्याची मागणी विक्रेत्यांनी पालिकेकडे केली आहे.
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने भाजीविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध केली. मात्र या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा न दिल्याने विक्रेत्यांनी पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण केले. ज्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले हे रस्ते आता भाजीविक्रेत्यांनी भरलेले दिसतात. भाजी विकून आम्ही इथल्या रहिवाशांचे पोट भरतो आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी आमच्या परिवाराचे पोट भरतो. प्रशासनानेच जर आमच्याकडे दुर्लक्ष केले तर, आम्ही आमचे दुखणे कोणाकडे मांडायचे? आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या जागेवर ना छत आहे, ना शौचालयाची सोय. उन्हातान्हात बसून भाजी विकायची आणि त्यातही दोन पैशांसाठी आम्हाला मारामारी करावी लागते. आमचा माल ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नसते, त्याचीही सोय आम्हालाच करावी लागते आणि मग त्यात काही मालाचे नुकसानही होत असल्याची व्यथा एका भाजी विक्रेत्याने मांडली. (प्रतिनिधी)