Join us  

नाल्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण

By admin | Published: April 25, 2016 3:24 AM

पावसाची पूर्वतयारी म्हणून महापालिकेने अनेक ठिकाणी नालेसफाईला सुरुवात केली असली तरी जोगेश्वरी येथील नाल्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

मुंबई : पावसाची पूर्वतयारी म्हणून महापालिकेने अनेक ठिकाणी नालेसफाईला सुरुवात केली असली तरी जोगेश्वरी येथील नाल्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. येथील नाल्यात प्लॅस्टिकचा खच साचला असून, या अस्वच्छ नाल्यामुळे जोगेश्वरी परिसरात रोगराई पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.जोगेश्वरी पूर्व रेल्वेस्थानकालगत नवलकरवाडी भांडी मंडई असून, या भाजी मंडईलगत हा नाला आहे. नाल्याची सुरुवात स्टेशनलगत असलेल्या ईस्माईल महाविद्यालयाकडून होते. साधारण १०० ते २०० मीटर असलेला हा नाला जोगेश्वरी स्थानकाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यास मिळतो. पावसाळ्यात हा नाला वाहता असतो. पण गेल्या काही महिन्यांपासून हा नाला सुकला आहे. प्लॅस्टिक, थर्माकोलमुळे या नाला अस्वच्छ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही, येथील गाळ उपसण्यात येतो. पण उपसलेल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे पुन्हा हा कचरा नाल्यात पडतो. पावसाळ्यासाठी मुंबईतील अनेक नाल्यांची स्वच्छता महापालिकेकडून करण्यात येत आहे. पण जोगेश्वरी नवलकरवाडी येथील नाल्याकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नाल्यात आजूबाजूचे दुकानदारही कचऱ्याच्या पिशव्या भिरकावतात. शिवाय मंडईतील भाज्यांचा ओला कचरा नाल्यात टाकल्यामुळे परिसरात कुबट वास पसरला आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेने नालेसफाईबरोबर नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करावी आणि नाला मोकळा करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)