Join us

शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी; 'ना हरकत' प्रमाणपत्राने मार्ग मोकळा

By जयंत होवाळ | Published: July 04, 2024 7:54 PM

शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना आता मुबलक पाणी मिळणार आहे.

मुंबई: शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. या भागात जलवाहिनी टाकण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबई महापालिकेला 'ना हरकत' प्रमाणपत्र दिल्याने जलवाहिनी टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवडी पूर्व भागातील  राजीव गांधी नगर,शिवडी गाडी अड्डा,गिरी नगर, रेती बंदर, इंदिरानगर हाजी बंदर, इंदिरानगर फोर्स बेरी रोड,कोळसा बंदर,अमन शांती नगर, जय भीम नगर, पारधी वाडा, आदी विभागामध्ये २०२१ सालच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करून ६ उंचाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. परंतु सदर जागा ही मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या मालकीची असल्यामुळे सदर जलवाहिनी द्वारे पाणी कनेक्शन देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची मंजुरी मिळत नव्हती. 

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टने जलवाहिनीद्वारे पाण्याची जोडणी देण्यासाठी 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवडी पूर्व परिसरात ३००० पेक्षा जास्त नागरी वस्ती असणाऱ्या झोपडी धारकांना अधिकृत पाणी जोडणी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 'ना-हरकत' प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पालिकेने स्थानिक रहिवाशांचे पाणी जोडणीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. इंदिरा नगर फोर्स बेरी रोड वरील १० नागरिकांनी केलेला संयुक्त अर्ज महापालिकेने मंजूर केल्यानंतर आज या जलवाहिनीच्या माध्यमातून घरोघरी पाणी पुरवठा चालू करण्यात आला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्यासह 'पाणी हक्क समितीने' यासाठी पाठपुरावा केला  होता. आज या पाणी योजनेचे लोकार्पण झाले.

टॅग्स :मुंबईपाणी