‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:08 AM2022-11-03T05:08:36+5:302022-11-03T05:10:02+5:30

‘लाँग कोविड सिंड्रोम’मध्ये कोरोनातून बरे होऊनही दीर्घकाळ राहणाऱ्या लक्षणांचा समावेश असतो.

Citizens of the state are suffering due to 'long covid syndrome'; Recommendation for immediate establishment of special OPD for 3 to 5 years | ‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

Next

- संतोष आंधळे

मुंबई : कोरोनाने काढता पाय घेतल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून सर्व काही आलबेल सुरू आहे. दोन वर्षांनंतर दसरा-दिवाळी हे सण दणक्यात साजरे झाले. कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडेही अनेकांनी पाठ फिरवली. त्यातच कोरोनाचे अनेक उपप्रकार येत असले तरी कोरोनाग्रस्तांची संख्या रोडावू लागली आहे. असे सकारात्मक चित्र असताना राज्यातील अनेकांना ‘लाँग कोविड सिंड्रोम’ छळत असल्याचे आढळून आले आहे. 

‘लाँग कोविड सिंड्रोम’मध्ये कोरोनातून बरे होऊनही दीर्घकाळ राहणाऱ्या लक्षणांचा समावेश असतो. त्यामुळे सर्वच सार्वजनिक रुग्णालयात किमान ३ ते ५ वर्षांसाठी विशेष ओपीडी चालू करण्याची गरज असल्याचे मत राज्य कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा नवीन एक्सबीबी उपप्रकार आल्याने राज्य कोरोना कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ‘लाँग कोविड सिंड्रोम’बद्दल सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची नियमित तपासणी आणि पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे कोरोना कृती दलाच्या सदस्यांनी सांगितले आहे. सद्य:स्थितीत राज्यात दीड हजार कोरोनाबाधित आहेत. 

काही महिने मी सातत्याने ‘लाँग कोविड सिंड्रोम’ या विषयावर बोलत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, हृदयाचे विकार, मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारी शारीरिक थकवा जाणवणे या आणि अशा अनेक व्याधींची भर पडली आहे. त्यासाठी शासनाला गरीब रुग्णांकरिता ३ ते ५ वर्षांसाठी विशेष ओपीडी चालू करण्याची गरज आहे. तसेच या उपचारांसाठी काही आर्थिक सहकार्य करता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे. कोरोनाचे आरोग्यावरील परिणाम ‘लाँग कोविड सिंड्रोम’मधून आजही जाणवत आहेत. 
- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, राज्य कोरोना कृती दल

कोरोनाची तपासणी कोणीही करत नाही. मात्र, ज्याला कोरोना होऊन गेला त्या व्यक्तीला काही महिने ते वर्षभरापर्यंत याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉइड्स आणि काही औषधे घ्यावी लागली होती. त्याचा परिणाम काहींना आता जाणवत आहे. गेले काही महिने व्हायरलच्या नावाखाली काही रुग्णांचा खोकला महिनाभर राहत आहे. 
- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ

काही जणांमध्ये लाँग कोविडच्या तक्रारी अजूनही आढळून येत आहेतच. या अनुषंगानेच आपण काही महिन्यांपूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.  राज्याचा कोरोना रुग्णाचा आकडा कमी होत असला तरी कोविडवरील उपचारानंतर अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग 

Web Title: Citizens of the state are suffering due to 'long covid syndrome'; Recommendation for immediate establishment of special OPD for 3 to 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.