पोस्टाच्या पासपोर्ट सेवेचा नागरिकांना ‘आधार’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:15 AM2018-07-15T06:15:07+5:302018-07-15T06:15:28+5:30
पोस्ट खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्र व आधार केंद्रांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटू लागला आहे.
- खलील गिरकर
मुंबई : पोस्ट खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्र व आधार केंद्रांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटू लागला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रांच्या माध्यमातून जून महिन्यापर्यंत सुमारे दोन लाख नागरिकांना पासपोर्ट देण्यात आले आहेत, तर आधार कार्डसाठीही या केंद्रांत गर्दी होत आहे. जूनअखेरपर्यंत २ लाख ७७ हजार ९३६ जणांनी या केंद्रांमध्ये आधार कार्ड दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत.
महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये २१ ठिकाणी पोस्ट कार्यालयांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १४ ठिकाणी केंद्रे उभारण्ली असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. येथील दोन ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्यात १ हजार २९३ ठिकाणच्या पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी व नूतनीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून जूनअखेर नवीन आधार नोंदणीसाठी २६ हजार ६०२ अर्ज करण्यात आले, तर आधार कार्डातील नाव व अन्य दुरुस्तीसाठी २ लाख ७७ हजार ९३६ जणांनी अर्ज केले आहेत. याशिवाय अर्जानुसार १ लाख ९५ हजार ३५७ जणांना पासपोर्ट मिळाले आहेत.
>आर्थिक लुटीपासून दिलासा
आधार कार्ड काढणे, त्यातील नावात बदल आदींसाठी यापूर्वी नागरिकांना खासगी ग्राहक केंद्रांकडे धाव घ्यावी लागत होती. या केंद्रांकडून त्यांची आर्थिक लूटही करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोस्ट कार्यालयातच आधार कार्ड मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. सोबतच पासपोर्टसाठी पासपोर्ट कार्यालयात फेऱ्या मारण्याचीही गरज नाही.
>येथे सेवा उपलब्ध
कोल्हापूर, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, वर्धा, सांगली, जालना, बीड, अहमदनगर, नांदेड, सातारा, जळगाव, पंढरपूर व दक्षिण गोवा या ठिकाणी, तसेच मुंबईच्या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
>प्रक्रिया सुरू
लातूर व पनवेल विभागात (अलिबाग मुख्य कार्यालय) येथे केंद्र सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
>प्रतीक्षा कायम
उत्तर मध्य मुंबई, नरिमन पॉइंट, सिंधुदुर्ग, डोंबिवली व नवी मुंबई या पाच ठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने व इतर तांत्रिक कारणांमुळे पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्याबाबत विभागीय पासपोर्ट कार्यालयाने नकार दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आणखी काही दिवस सदर सुविधा पोस्टात उपलब्ध होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.