पावसाळ्यात नागरिकांनी समुद्रात उतरू नये; अग्निशमन दल प्रमुखांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:31 PM2023-07-18T13:31:04+5:302023-07-18T13:31:35+5:30
अग्निशमन दल प्रमुखांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्राचे सर्वांनाच आकर्षण असते. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना गिरगाव, दादर, माहीम, जुहू व र्सोवा, आक्सा, गोराई या सहा ठिकाणी पर्यटक समुद्रात उतरतात. या काळात अर्ध्या मीटर पाण्यात जरी पर्यटक, विशेषकरून लहान मुले गेली तरी समुद्राच्या लाटा त्यांना
समुद्रात खेचतात. समुद्राबद्दल काहीही माहिती तसेच समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे चौपाटीवर पावसाळ्यात बुडण्याच्या दुर्दैवी दुर्घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रवींद्र आंबुर्लेकर यांनी लोकमतला दिली.
काल सकाळी मार्वे जेट्टीवर पाण्यात उतरलेली तीन मुले बुडाली. अग्निशमन दलाचे मुंबईच्या सहा बीचवर जीवरक्षक तैनात आहेत. पण मुंबईत समुद्रकिनारी सर्वच ठिकाणी जीवरक्षक तैनात करणे पालिकेला शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांनी भरतीत आणि समुद्र खवळलेला असताना बीचवर गेल्यास पाण्यात उतरू नये. तसेच आपली मुले कुठे जातात, बीचवर गेल्यावर पाण्यात उतरतात का, याकडे त्यांच्या पालकांनीही जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रविवारी अमावस्या आणि समुद्राला भरती असल्याने एक दिवस अग्निशमन दलाच्या फ्लड रेस्क्यू टीमचे अधिकारी तैनात केले होते.
आमचे जीवरक्षक बीचवर तैनात असतात. मात्र दररोज रेस्क्यू टीम बीचवर ठेवली तर मुंबईत पूर आल्यास काय करणार? असा सवाल रवींद्र आंबुर्लेकर यांनी केला.
भरती असल्यास आणि अन्य आवश्यक त्या दिवशी फ्लड रेस्क्यू टीम तैनात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.