- रेश्मा शिवडेकरमुंबई - लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर, समस्यांवर प्रचाराचा भर असला तरी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील गल्ल्यांमध्ये सध्या दिल्लीचीच चर्चा आहे. भाजपचे केंद्रीय वाणिज्य मंत्री, त्यातून पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतले असे पीयूष गोयल येथून लोकसभा लढवत आहेत. त्यामुळे गेले काही दिवस पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असे भरभक्कम शब्द इथल्या मतदारांच्या कानावर पडत आहेत.
या मतदारासंघातील सामाजिक, सांस्कृतिक संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिकांच्या, डॉक्टरांच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींसाठी गोयल यांनी चारकोपमधील एका वातानुकूलित बँक्वेट हॉलमध्ये गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. हाऊसिंग सोसायट्यांच्या प्रश्नांवर गोयल ठोस काहीतरी बोलतील म्हणून अनेक संस्थांचे पदाधिकारी बैठकीला आले होते. मात्र, त्यांची निराशा झाली. अखेर भाजपकडून ठेवण्यात आलेले जेवणखाण उरकून ही मंडळी मार्गाला लागली. चारकोपमध्ये पुरेसे पाणी नाही. त्यावर मंत्री काही ठोस बोलतील म्हणून आले. परंतु, हाऊसिंग सोसायट्यांवर ते काही बोललेच नाहीत, अशी प्रतिक्रिया सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने दिली.
आजवरच्या बहुतेक भाषणात देशाच्या अर्थव्यस्थेसाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती गोयल देतात. घर घर शौचालय, हर घर जल, आयुष्यमान भारत अशा केंद्रीय योजनांवर भर देत ते इथल्या मतदारांना मोदींना तिसऱ्या टर्मसाठी निवडून देण्याची साद घालत आहेत. बोरिवलीच्या चिकुवाडीतील डिव्हाईस बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या डॉक्टर आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या बैठकीत गोयल यांनी एम्सची, वैद्यकीय कॉलेजांची, जागांची संख्या कशी वाढली आहे, याची माहिती त्यांनी दिली. मात्र, दहिसरपासून मालाड पश्चिमेपर्यंत आणि दादर वांद्र्यातील रिअल इस्टेट मार्केटशी बरोबरी करणाऱ्या या मतदारसंघात एकही सुपरस्पेशालिटी रुग्णालय नसल्याची मतदाराची खंत आहे.