Pravin Darekar On Mumbai Local: कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व सामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अशातच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. त्यानंतर आता दरेकर यांनी मुंबईकरांसाठी लोकल प्रवास पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. (Citizens who taken both doses of corona vaccine should be allowed to travel by train demanded Praveen Darekar)
"कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झालेला आहे. आता त्यांना कामावर जाणं क्रमप्राप्त आहे. अशावेळेला लोकल सुरू नसल्यानं नागरिकांना वाहतुकीसाठी प्रतिक्षा करावी लागले. प्रवासाचा खर्च त्यांना परवडत नाही. कारण कसारा-कर्जत ते अगदी वसई-विरारपासून मुंबईत यायचं म्हटलं तर ७०० ते ८०० रुपये प्रवास खर्च होतो. इतर वाहनांसाठी तीन-चार तास वाट पाहावी लागतेय. कामावर गेलं नाही तर घर चालणार नाही. कोरोनामुळे आर्थिक कंबरडं मोडलं आहे. अशावेळेला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेचा प्रवास करू द्यायला काहीच हरकत नाही", असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी या मागणी संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना जर लोकल प्रवासाची परवानगी दिली नाही. तर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.