मुंबई: पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेनंतर बुधवारी रात्री राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकावर मतदान घेण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पाहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल! अशा शब्दांत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता,त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!"
याचबरोबर, आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपामुळेच झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच, या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. "काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले.. काहीजण "जनपथला" घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!" असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभेनंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी रात्री राज्यसभेतही संमत झाले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात १0५ मते पडली. मात्र, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तावाटपावरून भाजपाशी असलेली युती तोडणाऱ्या शिवसेनेने लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन दिले होते. परंतू राज्यसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला होता. त्यामुळे शिवसेना राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या दबावाखाली असे करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.