पालिकेच्या परिमंडळ ४ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:16 PM2020-04-09T15:16:47+5:302020-04-09T15:17:43+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे नागरिकांना घरीच राहा,सुरक्षित राहा असे सातत्याने आवाहन करत आहे
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- पालिकेच्या विलेपार्ले पश्चिम ते थेट मालाड पूर्व,पश्चिम पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या के पश्चिम,पी दक्षिण आणि पी उत्तर अश्या तीन वॉर्डचा मिळून पालिकेचा परिमंडळ ४ येतो. के पश्चिम मध्ये 46,पी दक्षिण मध्ये 18 व पी उत्तर वॉर्ड मध्ये 36 असे आजमितीस एकूण 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.परिमंडळ 4 मध्ये कोरोनाने सेंच्युरी पूर्ण केली असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
पालिका आयुुुक्त प्रवीण परदेशी यांच्या आदेशाने व आपल्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे या तीनही वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर यांच्यासह येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी,संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्ग दिवस रात्र काम करत आहे.पालिका प्रशासन परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे,मात्र नागरिकांनी घरात बसून व घराच्या बाहेर न जाता पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन परिमंडळ ४ चे उपायुक्त रणजित ढाकणे यांनी केले आहे.पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर कोणत्या उपाययोजना करत आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी लोकमतला दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे नागरिकांना घरीच राहा,सुरक्षित राहा असे सातत्याने आवाहन करत आहे.मात्र अजूनही याभागात नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांचे पालिकेला सहकार्य मिळणे ही काळाची गरज आहे.पोलिसांचे खूप चांगले सहकार्य आम्हाला मिळत आहे.मात्र बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याची विनंती आपण या भागातील पोलिस उपायुक्त,वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोरेगाव (पूर्व) हब मॉलच्या मागे आणि अंधेरी पश्चिम ओशिवरा येथील रूणवाल इमारतीत सबर्बन लॅबच्या माध्यमातून कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे.तसेच ज्या ठिकाणी विशेषकरून झोपडपट्टी आहे आणि नागरिक दाटीदाटीने राहतात याठिकाणी आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना झालेल्या रुग्णांच्या भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती रणजित ढाकणे यांनी दिली.येथील नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी मालाड पूर्व कुरार येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील 1 बीएचकेच्या 2 इमारतीतील 250 खोल्या पालिकेने ताब्यात घेतल्या असून येत्या दोन दिवसात आम्ही सुसज्ज क्वारंटाईन सेंटर तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडला तो भाग पोलिसांच्या मदतीने सील करण्यात येत असून त्याच्या आजूबाजूच्या इमारतीतील नसगरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आमचे वैद्यकीय पथक त्या इमारतीत जाऊन येथील नागरिकांची तपासणी करते.कोरोना रुग्णासाठी के पश्चिम वॉर्ड मध्ये ६०,पी दक्षिण वॉर्ड मध्ये ५० व पी उत्तर वॉर्ड मध्ये ६३ सुसज्ज बेड आम्ही तयार केले असून परिमंडळ ४ मध्ये सुमारे १२०० हॉटेल व खाजगी इमारतीमधील खोल्या आम्ही सज्ज ठेवल्या आहेत.तसेच परिमंडळ ४ मध्ये सेवाभावी संस्थांच्या मदतीने सुमारे २२०० ते २३०० गरजूंना व मजूरांना दोन्ही वेळचे जेवण तसेच वर्सोवा गुरुद्वारातर्फे २००० नागरिकांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.तसेच परराज्यातील येथे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था देखिल आम्ही केली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.