मुंबई: मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात २८ हजार १८ सफाई कामगार काम करतात. या सफाई कामगारांना देण्यात आलेल्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ असे नमूद केले आहे. मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सुरक्षा जॅकेटवर सध्या ‘क्लिन अप’ असे लिहिले आहे. मात्र आता मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगारांना नवीन ओळख मिळणार आहे. लवकरच पालिकेतील सफाई कामगार ‘सिटी ब्युटी फायर’ म्हणून ओळखले जातील.
शिवसेना प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी २०१८ साली केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिक्कीम राज्यात सफाई कामगारांना ‘ब्युटी फायर’ म्हणून संबोधले जाते त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना ‘सिटी ब्युटी फायर’ म्हणून संबोधण्यात यावे. त्यासाठी या सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘सिटी ब्युटी फायर’असे लिहिण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी २०१८ मध्ये ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. त्यास नगरसेविका व आताच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनुमोदन दिले होते.
हा ठराव नंतर मंजूर झाला व तो पालिका आयुक्त यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. मात्र ३ वर्षानंतर त्यावर पालिकाआयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे. सफाई कामगारांच्या सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ ऐवजी ‘सिटी ब्युटी फायर’ असे लिहिण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
सन २००६ मध्ये त्यावेळचे पालिका अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी त्यांनी सुंदर व स्वच्छ मुंबईसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असलेला ‘क्लिन अप’ योजनेच्या अंतर्गत काही कडक नियम केले होते. तेव्हापासून पालिका कचरा गाडीवर व पालिका सफाई कामगारांच्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ असे लिहिण्यात येते.