मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाने तातडीने या आगीवर नियंत्रण मिळणे आवश्यक होते. परंतु अग्निशमन दलाला यामध्ये यश आले नाही. आग लागल्यानंतर ती अग्निशमन दलाने विझविल्यानंतर पुन्हा काही काळाने आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर तात्काळ ही आग विझविणे शक्य झाले नाही ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे, अशी टीका प्रशासनावर केली जात आहे.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीवर दोन दिवस महानगरपालिकेला नियंत्रण मिळविणे का शक्य झाले नाही ? तसेच याबाबतची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ? हे महापालिका प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत. मॉलमधील आग विझविण्यास अपयशी ठरलेल्या मुख्य अग्निशमन अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष नेता रवि राजा यांनी हरकतीच्या मुद्दाव्दारे उपस्थित केली होती. या विषयावर मत व्यक्त करताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव बोलत होते. मॉलमध्ये नेमके काय बदल करण्यात आले होते, तसेच अग्निरोधक यंत्रणा कार्यरत होती की नाही ? या सर्व बाबी तपासात पुढे येणे आवश्यक असून संपूर्ण आगीच्या घटनेचा तपास करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वरळीच्या अॅट्रीया मॉलमध्ये मोठया प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी त्याचीसुध्दा चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, येथील आगीत अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. तर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले. येथील आग विझवण्यासाठी सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते.