आगडोंब! ‘सिटी सेंटर’ अग्नितांडव; पाच जवान जखमी, दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 10:37 AM2020-10-24T10:37:10+5:302020-10-24T10:40:17+5:30

दलाचे पाच जवान जखमी झाले असून, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले.

City Center Mall crash; Five jawans were injured, Akhya fire brigade ran out of water | आगडोंब! ‘सिटी सेंटर’ अग्नितांडव; पाच जवान जखमी, दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान

आगडोंब! ‘सिटी सेंटर’ अग्नितांडव; पाच जवान जखमी, दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान

googlenewsNext


मुंबई :मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग शमविण्यासाठी मुंबई महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान प्राणाची बाजी लावून लढले.  आग विझविण्यासाठी संपूर्ण मुंबईतून फायर इंजीन घटनास्थळी धाडण्यात आले होते, अशी माहिती अग्निशमन दलानेच दिली. 

दलाचे पाच जवान जखमी झाले असून, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील आग विझविण्यासाठी सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत होते. आग विझविण्यासाठी २४ फायर इंजीन, १६ जम्बो टँकर यांच्यासह एकूण ५० अग्निविमोचक वाहने तैनात, कार्यरत होती.

सेंटर मॉलला लागलेली आग शुक्रवारी  दुपारी ३.३६ वाजता कव्हर करण्यात आली. येथील आग कव्हर करताना जवानांनी अथक परिश्रम केले. आग कव्हर करताना ती पसरू नये, याची काळजी घेण्यात आली. मुळात येथील आग कव्हर करताना लगतच्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही, आगीची झळ बसणार नाही याची काळजी घेण्यात आली. लगतच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे ३ हजार लोकांना परिसरातील मैदानात नेण्यात आले. हे करताना पुन्हा येथील वाहतूक व्यवस्थेला अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आली. सकाळी आग शमविताना येथील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. सुरुवातीला छोटी वाटणारी आग कालांतराने पसरली. मुळात आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कोणालाही दुखापत होणार नाही यासाठी काम सुरू झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व यंत्रणा सुरू केल्या. केवळ अग्निशमन दलाचे जवान नाही तर पोलीस, महापालिका कर्मचारी अशा मोठ्या फौजफाट्यासह आग विझविण्यासाठी काम सुरू करण्यात आले. गुरुवारी रात्री आग लागली तेव्हा मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि हाच धूर आग विझविण्यासाठी अडथळा ठरत होता. परिणामी, गुरुवारी रात्री छोटी असणारी आग मध्यरात्री भडकली आणि शुक्रवारी सकाळीदेखील त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजतादेखील येथील आग विझविण्याचे काम केले जात होते. दिवसभर काम सुरू असतानाच दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग कव्हर करण्यात आली. येथील आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या ए, सी आणि डी वार्डमध्ये पाण्याचे टँकर भरण्यात आले. आणि येथून ते घटनास्थळी धाडण्यात आले. या टँकरची संख्या ८० वर होती, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. याव्यतिरिक्त आग शमविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात आला. धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर येत असतानाच फायर ब्रिगेड काम करीत होती.

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आपले काम चोखपणे बजावत येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू ठेवले. या जवानांमध्ये एच.डी. परब, मांजरेकर, चौधरी, ए.एच. सावंत, घोष, आर.व्ही. भोसले, डी.एस. पाटील, मयेकर, तळेकर, एम.आर. सुर्वे, आर.व्ही. मोरे, एम.जी. वर्णेकर, इरंडे, यू.वाय. बोबडे, पी.एस. माने, खोपडे, खरटमल, तांडेल, पोळ, एस.एम. कांबळे, डी.एम. पाटील, सकपाळ यांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.

- मुंबईला सर्वांत जास्त सुरक्षित शहर मानले जाते. मात्र तरीही २०१९ साली आगीच्या ५ हजार २५४ दुर्घटनांत एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात २४ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. २१६ जण जखमी झाले. त्यात १४२ पुरुष आणि ७४ महिलांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना प्राप्त कागदपत्रांमध्ये ही माहिती समोर आली आहे. 

- महत्त्वाचे म्हणजे आग शमविण्यासाठी आज तंत्रज्ञानाचा वापर केला जात असूनदेखील तब्बल २४ तासांहून अधिक काळ आग धुमसत असल्याने पुन्हा एकदा सुरक्षित मुंबईचा प्रश्न समोर आला आहे. या आगीच्या घटनेमुळेदेखील पुन्हा एकदा मॉलमधील सुरक्षेसह अग्नी प्रतिबंधित उपाययोजना कितपत अद्ययावत आहेत? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर या मॉलला भीषण आग लागली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील मोबाइल दुकानाला लागलेली आग संपूर्ण मॉलभर पसरली. आग विझविण्यासाठी दहा तासांपासून अधिक काळ अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सिटी सेंटर मॉलमध्ये जवळपास २०० हून अधिक दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये मोबाइल ॲक्सेसरीजची दुकाने जास्त आहेत. त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. 

- कोरोनामुळे मॉल हाउसफुल्ल नसल्याने सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. मात्र मॉलसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षेची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, २००८ सालापासून २०१८ पर्यंत एकूण ५३ हजार ३३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ मुले, ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: City Center Mall crash; Five jawans were injured, Akhya fire brigade ran out of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.