Join us

सिटी सेंटर मॉलला आग; ३ हजार ५०० रहिवाशांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 5:55 PM

Fire in Mumbai : शुक्रवारी दुपारपर्यंत साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग कव्हर करण्यात आली.

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी लागलेल्या आगीत शामराव बंजारा, रवींद्र प्रभाकर चौगुले, भाऊसाहेब बदाने, संदीप शिर्के आणि गिरकर हे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले. तर सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले. येथील आग विझवण्यासाठी सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. शुक्रवारी दुपारपर्यंत साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग कव्हर करण्यात आली.

गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी सिटी सेंटर मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरा नंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली. येथून मोठया प्रमाणावर धूर येत होता. त्यामुळे आग शमविण्यात अडथळे येत होते. सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली.  या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे होते. या गाळ्याना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँकर यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात, कार्यरत होती. गुरुवारी रात्रभर येथील आग शमविण्याचे काम सुरु होते. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्नि विमोचन वाहने रवाना केली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने गुरुवारी मध्यरात्री २ वाजून ४१ मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉल स्तराची अग्निशमन दलाने घोषित केली. शुक्रवारची पहाट उजाडली तरी आग शमविण्याचे काम सुरु होते. अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक, इतर मदतीसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले होते. अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.   

टॅग्स :आगमुंबईमुंबई महानगरपालिका