Join us

शहरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आजार वाढले

By admin | Published: July 18, 2014 1:02 AM

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांवर वरुणराजाची कृपा झाली आहे. संततधार सुरू असल्यामुळे मुंबईतील पावसाळी आजारांचा आकडा थोडासा वाढलेला आहे

मुंबई : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांवर वरुणराजाची कृपा झाली आहे. संततधार सुरू असल्यामुळे मुंबईतील पावसाळी आजारांचा आकडा थोडासा वाढलेला आहे. ७ ते १३ जुलैदरम्यान मुंबईमध्ये १ हजार २०४ तापाचे तर गॅस्ट्रोचे ३७३ रुग्ण आढळून आले आहेत.जूनमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे २०१३ च्या तुलनेत जून २०१४ मध्ये आजारी पडलेल्या मुंबईकरांचा आकडा तुलनेने कमी होता. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र रुग्णांची संख्या वाढलेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तापाचे १ हजार २७८ रुग्ण आढळून आले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मलेरियाचे १२३ रुग्ण आढळून आले होते, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये १५९ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे फक्त ९ रुग्ण दुसऱ्या आठवड्यात आढळून आले आहेत. हिपॅटायटिसचे ३८, टायफॉइडचे २६ रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकही कॉलराचा रुग्ण आढळून आला नव्हता. दुसऱ्या आठवड्यामध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये लेप्टोचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पहिल्या आठवड्यात २ रुग्ण आढळले होते. जूनमध्ये चिकनगुनियाचे ५ रुग्ण आढळले होते. मात्र जुलै महिन्याच्या दोन्ही आठवड्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही. स्वाइन फ्लूचाही जुलै महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. (प्रतिनिधी)