Join us  

सिटी लाइफलाइनच्या घशात घनकचऱ्याचे कंत्राट?

By admin | Published: March 11, 2017 1:21 AM

ठाणे महापालिकेने कृपादृष्टी केलेल्या सिटी लाइफलाइनचे बस दराचे कंत्राट अडचणीत आले असतानाही घनकचरा विभागाचे सोन्याची अंडी देणारे कंत्राटही याच कंत्राटदाराच्या

ठाणे : ठाणे महापालिकेने कृपादृष्टी केलेल्या सिटी लाइफलाइनचे बस दराचे कंत्राट अडचणीत आले असतानाही घनकचरा विभागाचे सोन्याची अंडी देणारे कंत्राटही याच कंत्राटदाराच्या घशात घालण्याची तयारी सुरू असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सत्ताधारी गटातील एक बडा नेताच या सिटी लाइफलाइनवर मेहरनजर करीत असल्याची बाबही आता समोर येत असून हा बडा नेता कोण, याची चर्चा रंगली आहे. ठाणे महापालिकेने २०१५ मध्ये जेएनएनयूआरएम अंतर्गत १९० बस खरेदी केल्या आहेत. या बस ठाणे व मुंबई महानगर प्रदेशासाठी वापरायच्या होत्या. त्यासाठी प्रति किमी दराने चालविणारा खासगी ठेकेदार पालिकेला हवा होता. त्याचे कंत्राट सिटी लाइफलाइनला देण्यात आले. त्याच्या दरातील तफावतीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर ठाण्यातील दक्ष नागरिकांसह राजकीय पक्षांनीही त्याविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने तर थेट या प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. अशी पार्श्वभूमी असतानाही पालिकेने याच ठेकेदाराला आणखी कंत्राटाची कवाडे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कचरा प्रक्रिया करणारे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा वाटा हीच कंपनी उचलणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. पालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून विटा तयार केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून उभारला जाणार असून पालिका संबंधित ठेकेदाराला कचरा, वीज आणि इतर साहित्य पुरविणार आहे. त्यातून आलेल्या उत्पन्नाचा काही हिस्सा पालिकेला मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, या कामासाठी निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. (प्रतिनिधी) कंत्राटासाठी शिवसेना नेत्याचा हट्टपुन्हा याच कंपनीला हे कंत्राट देण्यासाठी शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने हट्ट धरला असल्याची माहिती आहे. हे थेट दिल्ली कनेक्शन असल्याचेही बोलले जात आहे. किंबहुना या कंत्राटदाराला ठाण्यात आणण्यासाठी या नेत्याच्या एका निष्ठावान नगरसेवकानेच आपल्या या बड्या नेत्यावर दबाव आणल्याचे बोलले जाते. याच्या निविदा येत्या काही दिवसांत काढल्या जाणार आहेत. ज्या पद्धतीने इथेनॉल बसचे कंत्राट या ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच धर्तीवर घनकचऱ्याचे कंत्राटही याच कंत्राटदाराच्या घशात घालण्यासाठी पालिकेतीलच काही अधिकारी प्लॅनिंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता आयुक्त या ठेकेदाराला वेसण घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.