लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येत्या आठवडाअखेरीपर्यंत सात हजार खाटांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहर-उपनगरातील ६९ नर्सिंग होम पालिकेने ताब्यात घेतले असून या माध्यमातून खाटांची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे.
पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयात २ हजार २६९ खाटा वाढविल्या आहेत, याचा वापर विलगीकरण कक्षातील खाटांकरिता करण्यात येणार आहे. सध्या जवळपास तीन हजार खाटा मुंबईत रिक्त राहत आहेत, यात खासगी रुग्णालयातील ४५० खाटांचा समावेश आहे. पालिका रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांतील खाटा आरक्षित होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून महिन्याभरात ३७ हजार रुग्णांचे निदान झाले आहे.
खाटांच्या उपलब्धतेत गैरसोय टाळून पारदर्शकता टिकविण्यासाठी रुग्णांना थेट रुग्णालयात खाटा मिळणार नसून त्याकरिता २४ विभागांतील वॉररूममध्ये संपर्क साधावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णांना थेट दाखल करून घेतल्यास खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्यूही वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे, तसेच गृहविलगीकरणात नियमांचे पालन न करणे ही प्रमुख कारणे असू शकतात असे, कृती दलातील डॉक्टर्सनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे शोध, चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रींवर भर देण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.