नागरी सुविधांचा दर्जा उत्कृष्ट राहावा
By admin | Published: September 11, 2015 02:06 AM2015-09-11T02:06:59+5:302015-09-11T02:06:59+5:30
पश्चिम उपनगरातील पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेवर उड्डाणपुलाची शृंखला जोडण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असून, विविध नागरी सेवांचा
मुंबई : पश्चिम उपनगरातील पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेवर उड्डाणपुलाची शृंखला जोडण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असून, विविध नागरी सेवांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहावा म्हणून महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले.
जोगेश्वरी येथील जोगेश्वरी पूर्व व पश्चिमेस जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुला’च्या उद्घाटन व नामकरणाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, महापालिकेकडून दर्जेदार नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. या सर्व नागरी सुविधेत प्रशासन आपले सर्व ते प्रयत्न करते. मुंबईत नागरी सेवा-सुविधा पुरवीत असताना काही चूक झाली की सर्व खापर मात्र महापालिकेवर फोडले जाते. मात्र असे असले तरी मुंबईकरांना सर्व प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच रेल्वेवरील आणखी प्रलंबित उड्डाणपूल लवकरच पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले. तर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, या उड्डाणपूलासाठी ९३० नागरिकांचे स्थलांतर करावे लागणार होते. हे मोठे काम अत्यंत जिकिरीचे होते. मात्र पालिका प्रशासनाने सहकार्य केल्याने ते पूर्ण करता आले.
महापालिका नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अनेक प्रकल्प, उपक्रम हाती घेत असते. पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करत असताना काही अवधी लागतो. पण नागरी सेवा हाच या उपक्रमांचा उद्देश असतो.
- अजय मेहता, आयुक्त
जोगेश्वरी पूर्व व पश्चिमेस जोडणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा झाला आहे. जोगेश्वरी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याकरिता सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागतो, तो आता फक्त ३ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त