वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण होत नाही तोवर नागरी सत्कार स्वीकारणार नाही- गोपाळ शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 06:22 PM2022-03-18T18:22:41+5:302022-03-18T18:23:13+5:30
जोपर्यंत माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कांदिवली पूर्व येथील समता नगर येथे आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील केंद्र सरकारच्या जागेवर होत नाही तोपर्यंत आपण नागरी सत्कार स्वीकारणार नाही
मुंबई-
जोपर्यंत माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कांदिवली पूर्व येथील समता नगर येथे आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील केंद्र सरकारच्या जागेवर होत नाही तोपर्यंत आपण नागरी सत्कार स्वीकारणार नाही असे ठाम प्रतिपादन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी काल सायंकाळी कांदिवलीत केले.
1992 पासून लोकप्रतिनिधीं म्हणून तीन वेळा नगरसेवक,दोन वेळा आमदार,आता खासदार म्हणून त्यांची दुसरी टर्म अशी सुमारे 30 वर्षे लोकप्रतिनिधी पूर्ण करणाऱ्या खासदार शेट्टी यांचा नागरी सत्कार काल सायंकाळी कांदिवली पश्चिम सप्ताह मैदान, महावीर नगर येथे पोयसर जिमखाना,युवक मंडळ यांनी आयोजित केला होता.यावेळी सुमारे 5000 नागरिकांच्या उपस्थित त्यांनी ही घोषणा केली.
गेल्या 30 वर्षीच्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत आपल्यावर कुठलाही डाग नाही.आपण कोणाचा एक पैसा जरी घेतला असेल हे कोणी सिद्ध करून दाखवल्यास आपण त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊ असे त्यांनी यावेळी जाहिर केले.2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा दारुण पराभव करून महाराष्ट्रात आपल्याला सर्वाधिक मते आपल्याला येथील मतदारांनी दिली. आपल्याला मिळालेली जनतेची साथ,कार्यकर्त्यांचे प्रेम यामुळे आज मी उभा आहे.जनतेची सेवा करण्यासाठी मला केंद्रात मंत्रिपद नको,तर जनतेची सेवा करण्यासाठी मला चांगले आरोग्य लाभो ही तुम्ही देवाकडे प्रार्थना करा असे आवाहन त्यांनी केले.
द काश्मीर द फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करा यामागणीला आपण सहमत नाही,तर येत्या रविवारी चित्रपट गृहात हा चित्रपट आयोजित करून त्याच्या तिकीट विक्रीतून जमा होणारे 5 लाख रुपये आपण मुंबईतील निर्वासित काश्मिरी पंडितांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहिर केले.
जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा वामनराव पै आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,जो सर्वांचा विचार करतो,त्याचा विचार सर्वजण करतात. खासदार गोपाळ शेट्टी हे खऱ्याअर्थाने खासदार असून त्यांची दारे 24 तास सर्वांसाठी खुली असतात.त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास ते अजून चांगल्या प्रकारे काम करून जनतेची सेवा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार योगेश सागर,आमदार भाई गिरकर,आमदार मनीषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर,आमदार सुनील राणे,उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष गणेश खणकर, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार,पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी,उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,युवक मंडळाचे अध्यक्ष गणेश बारी,डॉ.योगेश दुबे,अँड.जे.पी.मिश्रा,श्रीकांत पांडे,किशोर चित्राव,उत्तर मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक, भाजपाचे माजी नगरसेवक,कार्यकर्ते,नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.