Join us

नागरी पुरवठा विभागाचे ‘माझे रेशन, माझा अधिकार’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:07 AM

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन, माझा अधिकार’ असा मंच करून ...

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन, माझा अधिकार’ असा मंच करून स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी, जास्तीतजास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील गरीब व गरजू पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता स्वयंसेवी संस्थासमवेत वेबिनारद्वारे ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी पगारे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. तसेच, नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति माह पाच किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. जूनमध्ये अशाच प्रकारे अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. एनईआरमध्ये वर्ग केलेल्या शिधापत्रिकाधारकांनादेखील देय अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. याची माहिती सर्व स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली. एकूण पात्र शिधापत्रिकांपैकी ९० टक्के शिधापत्रिकाधारक ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. उर्वरित १० टक्के पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांना धान्याचा लाभ मिळणेकरिता उपस्थित स्वयंसेवी संस्थांना जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व परप्रांतीय, स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांनी ‘एक देश, एक रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे जवळच्या शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य घेता येणार आहे. टाटा सामाजिक संस्था यांनी काही भागांमध्ये पात्र लाभार्थ्यांना देय असणारे अन्नधान्य, दर त्याचप्रमाणे अन्नधान्य मिळण्याबाबतची निश्चित वेळ एस.एम.एस.द्वारे कळविण्याचा पथदर्शी उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर अन्य सामाजिक संस्थांनी पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.