‘कर्फ्यू’सदृश परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:35 AM2018-12-19T04:35:23+5:302018-12-19T04:36:06+5:30
पोलीस बंदोबस्ताचा फटका : विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार हैराण
कल्याण : मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि सिडकोच्या घरांच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील वासुदेव बळवंत फडके मैदानात आल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात काही काळ ‘कर्फ्यू’सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी त्रासलेले स्थानिक रहिवासी व दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील फडके मैदानाशेजारी विघ्नहर, सुमंगल टॉवर, द्वारका या इमारती तसेच सुभाषनगर येथे काही चाळी आहेत. मैदान परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी सभेपूर्वी आणि नंतर मोदींच्या ताफ्यातील वाहनांना वाहतुकीचा अडथळा येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. त्याकरता तेथील रहिवाशांना इमारतीबाहेर पडण्यास मज्जाव केला. त्याचा त्रास शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना झाला. यामुळे तेथील रहिवाशांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचेही दिसून आले. परिसरातील भाजी विक्रेत्यांचे स्टॉल, किराणा दुकानेही पोलिसांनी बंद केल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. परिसरातील इमारतींमधील रहिवाशांना स्वत:ची दुचाकी आणि मोटारी बाहेर काढण्यास मनाई करण्यात आली होती. काही काम असेल तरच घराबाहेर पडा, असे तोंडी आदेश रहिवाशांना पोलिसांनी दिल्याचे बोलले जाते. या निर्बंधामुळे रहिवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला.
दरम्यान, फडके मैदानातील मुख्य सभा मंडप भरल्याने अनेकांनी रस्त्यावर उभे राहणे पसंत केले. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ गोंधळ उडाला. परिणामी, दुर्गामाता चौक ते वाडेघर चौक पूर्णपणे बंद झाल्याने ठाण्याच्या दिशेने ये-जा करणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.
मनसेने काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
आधारवाडी स्मशानभूमी मंगळवारी बंद ठेवल्याच्या निषेधार्थ कल्याणमधील मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘भाजपा सरकार हाय हाय’च्या घोषणा देत खडकपाडा येथे अंत्ययात्रा काढली होती. तसेच १५ लाख रुपयांच्या प्रतीकात्मक धनादेशाचे आणि गाजराचेही वाटप केले. याप्रकरणी पोलिसांनी या सर्वांना अटक करत नंतर सोडून दिले.
कल्याण पूर्वेत गाजराचे तोरण कल्याण पूर्वेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे भारताच्या प्रधान सेवकाचे लक्ष वेधण्यासाठी ‘कल्याण विकासिनी’ आणि ‘सोचो कट्टा’ या सोशल मीडिया ग्रुपने कल्याण पूर्वेतील लोकग्राम आणि सिद्धार्थनगर येथील स्कायवॉकला गाजराचे तोरण लावले. गाजरांच्या तोरणाचे समर्थन करणारे माजी नगरसेवक उदय रसाळ यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते ताब्यात कल्याणमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असताना मोदी मेट्रोचे भूमिपूजन करणार असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरू नयेत तसेच भूमिपूजन कार्यक्रमात अडथळे येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कॉँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांना सकाळीच ताब्यात घेतले. तर, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनाही पूर्वेतील निवासस्थानातून बाहेर पडू नये, अशी ताकीद पोलिसांनी दिली होती. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश तिवारी, युवक जिल्हाध्यक्ष राहुल काटकर यांच्यासह इतरांना सभा स्थळाजवळून ताब्यात घेतले.
गतिरोधक काढल्याने झाला अपघात मोदींच्या दौºयामुळे दोन दिवसांपूर्वी बापगाव ते फडके मैदान रस्त्यातील गतिरोधक दोन दिवसांपूर्वीच हटविण्यात आले होते. परंतु, गतिरोधक नसल्याने भरधाव आलेल्या एका मोटारीने दोन सायकलींसह पोलिसांना धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी गांधारी पुलाजवळ घडली. या अपघातात दोन सायकलस्वार गंभीर तर, दोन पोलीस किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिक-पोलिसांमध्ये बाचाबाची फडके मैदान परिसरात सभेसाठी येणारे पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी सुभाषनगर, आधारवाडी चौक, गांधारी रस्ता या ठिकाणी दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी सुभाषनगर आणि आधारवाडी चौक परिसरात उभ्या राहिलेल्या नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये थोड्याफार प्रमाणात बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
हजारो कार्यकर्ते बाहेर ताटकळले
मोदी सभा मंडपात दाखल झाल्यानंतरही हजारो कार्यकर्ते बाहेर ताटकळत होते. उन्हात उभे होते. काहींनी झाडांच्या सावलीचा आसरा घेतला. आठ मुख्य ठिकाणी काही अंतरांवर उभ्या असलेल्या व्हॅनवरील एलईडी स्क्रीनद्वारे त्यांनी भाषण ऐकणे पसंत केले. या स्क्रीनवर मुख्य सभा मंडपातील व्यासपीठावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
‘जय श्रीराम’, ‘हर हर मोदी’च्या घोषणा
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने कल्याणमध्ये आगमन झाल्याची माहती व्यासपीठावरून देण्यात आल्यानंतर फडके मैदानातील सभा मंडपातील आणि बाहेर उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. श्रीराम मंदिर कायदा करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्यानंतर प्रचंड घोषणा व जल्लोषात कार्यकर्त्यांनी मोदींचे स्वागत केले.
च्मोदींनीही मनसोक्त हात उंचावून कार्यकर्त्यांना साद दिली. कल्याणजवळील बापगाव येथील मोकळ्या भूखंडावरील हॅलिपॅडवर दुपारी २.३० वाजता मोदी यांचे आगमन झाले. तेथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी दुपारी २.४० नंतर फडके मैदानाकडे कूच केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रचंड पोलीस बंदोबस्त ताफा पुढे सरकला. यावेळी रस्त्यांवर उभे असलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोदींना बघण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र, ताफ्यातील नेमक्या कोणत्या गाडीत पंतप्रधान बसले होते, हे न कळाल्यानेही अनेकांचा भ्रमनिरास झाला.