‘सिंहासन’मधील सुसंस्कृतपणाची आज राजकारणात कमतरता- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:46 AM2023-04-12T06:46:27+5:302023-04-12T06:46:53+5:30
‘सिंहासन’ हा मराठी चित्रपट आला, त्यावेळच्या राजकारणात सुसंस्कृतपणा होता. त्याची आज कमतरता जाणवते आहे.
मुंबई :
‘सिंहासन’ हा मराठी चित्रपट आला, त्यावेळच्या राजकारणात सुसंस्कृतपणा होता. त्याची आज कमतरता जाणवते आहे. आज जी टोकाची भाषा वापरली जाते तेव्हा ती नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
सिंहासन चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांच्यासह ‘सिंहासन’चे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, चित्रपटातील कलाकार मोहन आगशे, नाना पाटेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी पत्रकार अंबरिश मिश्र तसेच राजीव खांडेकर यांनी संवाद साधला. महाराष्ट्राचे राजकारण दहा वर्षांनी बदलत असते. आजची तरुण पिढीही या चित्रपटाबद्दल विचारत असते असे, डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
‘सिंहासन’ हा वसंतराव नाईक यांच्या राजकीय भूमिकेवरील चित्रपट होता. बँकेकडून ४ लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. खर्चाची अडचण होती. त्यामुळे मंत्रालय, विधानभवन असे सेट उभे करण्यापेक्षा पटकथा लिहिणारे विजय तेंडुलकर यांनी मला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. मी त्यांना भेटून विनंती पत्र दिले. मात्र, मुख्य सचिवांनी विरोध केला. पवारांनी मात्र चित्रीकरणासाठी मंत्रालयाची वास्तू उपलब्ध करून दिली. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज विधिमंडळ म्हणून दाखवण्यात आल्याचे डॉ.पटेल यांनी सांगितले.
कोण काय म्हणाले...
सिंहासनमध्ये काशिनाथ घाणेकर नव्हते, तेव्हा घाणेकर यांनी माझी कॉलर पकडून मला चित्रपटात का घेतले नाही, असे विचारले होते, अशी आठवणही जब्बार पटेल यांनी सांगितली.
सिंहासनमध्ये ३६ कलाकारांनी काम केले आहे. त्यापैकी डॉ. मोहन आगाशे आणि मी असे दोनच कलाकार आज जिवंत असल्यामुळेच आजच्या व्यासपीठावर आम्हाला बोलावण्यात आल्याचे दिसते. कारण, आम्हाला काहीच प्रश्न विचारले जात नाहीत, अशी कोपरखळी अभिनेते नाना पाटेकर यांनी लगावली.
राजकारण कधीही निरागस नसते. राजकारण्यांची काही नीतीमूल्ये असतात; पण ती आता गुंडाळली गेली आहेत, असे मोहन आगाशे म्हणाले.
सिंहासन चित्रपटात निळू फुले या पत्रकाराबाबत आपणास सहानुभूती वाटली, असे शरद पवार म्हणाले.